आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात अधिकमासानिमित्त तसेच या महिन्यात आलेल्या एकादशीनिमित्त भाविकांनी श्रींचे समाधी दर्शनास गर्दी केली. आळंदीत एकादशी निमित्त भाविकांनी नगरप्रदक्षिणा नामजयघोषात केली. भाविकांच्या गर्दीने आळंदीत आषाढी-कार्तिकीची आठवण झाली. माऊली मंदिर भागात गर्दीने परिसरात वाहनाच्या रांगा लागल्या. वाहतुकीच्या कोंडीने पादचारी भाविकांना रहदारीला अडथळा ठरला. मंदिर समोर आलेल्या दुचाकी वाहनांमुळे रहदारीला अडचण झाली. वाहने थेट मंदिर समोर आल्याने वाट काढीत भाविकांना दर्शनास यावे लागल्याने वृद्ध भाविकांनी नाराजी व्यक्त केली.
माऊली मंदिरात एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रम मंदिरातील प्रथेप्रमाणे झाल्याचे व्यवस्थापक वीर यांनी सांगितले. वीर म्हणाले की, आळंदीत भाविकांची गर्दी अधिक महिन्यामुळे खूपच वाढली. मंदिरात पहाटे 4 वाजता घंटानाद, काकडा आरती, श्रींचे संजीवन समाधीस पवमान अभिषेक, भाविकांसाठी श्रींचे समाधी दर्शन, सकाळी नऊ वाजता गाथा भजन, दुपारी चार वाजता प्रवचन सेवा, संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळात कीर्तन सेवा, श्रींची धुपारती, रात्री दहा वाजता गावकरी भजन, रात्री बारा ते पहाटे चार या वेळेत जागर धार्मिक झाले. राम वाड्यातील दर्शन बारीतून भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. दर्शनबारी इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलावरून आणण्यात आली. आळंदी नगरपरिषदेने सेवा सुविधा दिल्याने भाविकांची गरसोय झाली नाही.
काळजी घेण्याच्या सूचना
मुख्याधिकारी समीर भूमकर म्हणाले, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, शहरात धुरीकरण, जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली आहे. येणार्या भाविकांसह येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. येणार्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी नगरपरिषद आणि अधिकारी लक्ष देऊन आहेत.