ज्यांच्यावर जवाबदारी दिली ‘त्या’ कटाप्पांनी कट रचला : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray clearly said; Ravana has changed with time: now 50 boxes ‘Khokasur’ मुंबई : शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमके काय बोलतात ? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. सभेच्या सुरूवातीपासून उद्धव ठाकरे यांनी आक्रमक ठाकरे शैलीत मुख्यमंत्र्यांवर टिकेचे बाण चालवत, फडणवीस, अमित शहांवर चौफेर टिका केली. ठाकरे म्हणाले की, काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आत्तापर्यंत दहा तोंडाचा होता मात्र आता 50 खोक्यांचा खोकासूर, आला आहे, असे ते म्हणाले.

मी उपचार घेत होतो मात्र ते कट रचत होते
ठाकरे म्हणाले की, शिवसेना ही माझ्या एकट्या-दुकट्याची नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे. एक जरी निष्ठावंत शिवसैनिक उठून बोलेन गेट आउट…मी असाच पायर्‍या उतरून घरी निघून जाईन, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच हॉस्पिटमध्ये असताना ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते कटाप्पा कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच कसा शकणार नाही. पण त्यांना कल्पना नाही, हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे.

शंभर दिवसांपैकी 90 दिवस ‘दिल्लीवारी’
शिंदे सरकारला 100 दिवस पूर्ण झालेते म्हणे मात्र त्यातले 90 दिवस दिल्लीला जाण्यात गेले. यांनी त्यांचं हिंदुत्व काय आहे हे सांगावं आणि मी माझं हिंदुत्व काय आहे हे सांगतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्या मनात एकदा विचार आला होता की, या सभेला येण्याऐवजी तिकडे जाऊन नवीन हिंदुत्वाचे विचार ऐकून यायचे, असा मिश्किल टोलाही देखील उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच तुमचं हिंदुत्व नेमकं आहे, तरी काय?, असा सवाल उपस्थित केला. यांना आम्ही गद्दारच म्हणणार..कपाळीचा गद्दार हा शिक्का पुसता येणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

होय अडीच-अडीच वर्ष सत्तेबाबत ठरले होते : आई-वडिलांची शप्पथ
अमित शाह म्हणाले की शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत काही ठरलं नव्हतं. मात्र मी शिवरायांच्या साक्षीने, आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो. अडीच-अडीच वर्षं मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायची हे ठरलं होतं. अडीच वर्षं भाजपा – अडीच वर्षं शिवसेनेची हेच तेव्हा सांगत होतो. आत्ता केलं, ते तेव्हा का नाही?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. माझ्या शक्तीशी पंगा घेतलेला आहात, देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही. तेजाचा शाप आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

फडणविसांना सुनावले, कायदा मांडीवर कुरवाळत बसा
शिवसेनेचा वाघ आनंद दिघे हे कायम पक्षाशी एकनिष्ठ होते. जातानाही ते भगव्यातून गेले. त्यांनी भगवा कधीही सोडला नाही. आता राज्य सरकारमधील काही लोक जाणूनबुजून आमच्या शिवसैनिकांना त्रास देत आहेत. पण मी आधीच सांगून ठेवतोय, जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका. माझ्या शिवसैनिकांवर अन्याय कराल, तर खपवून घेणार नाही. तुमचा कायदा तुम्ही मांडीवर कुरवाळत बसा. एकतर्फी कायद्याचा वापर आम्ही होऊ देणार नाही, अशी ’वॉर्निंग’ उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिली.