बंगळूर- काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या बोगीबील पुलाचे उद्घाटन झाले. आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला हा सर्वात मोठा डबल डेकर पूल आहे. पाच किमीच्या यापुलावर रस्ता आणि रेल्वे मार्ग आहे. याच उद्घाटन सोहळ्याबाबत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा नाराजी व्यक्त केली आहे. २१ वर्षापूर्वी मी या पुलाची पायाभरणी केली होती आणि आता उद्घाटनाला मलाच बोलविण्यात आले नाही, असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
बोगीबील रेल्वे आणि रस्ता डबलडेकर पूल, काश्मीरसाठी रेल्वे मार्ग या योजना मी १९९७ मध्ये सुचवल्या होत्या. त्या काळात मी पंतप्रधान होतो आणि बोगीबील पूल योजनेला मंजुरी दिली होती. या प्रकल्पाची सुरुवात करणाऱ्या माणसाला मोदी सोयीस्करपणे विसरले असेही देवेगौडा यांनी म्हटले आहे.