ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णनाथ रॉयने पटकावले सुवर्णपदक

0

मुंबई । भारतीय खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेत कोणतंही पदक मिळवले तर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातो. पण आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये 15 वर्षांखालील चार विद्यार्थ्यांनी तब्बल 4 सुवर्णपदके आणि 2 रजत पदकांची कमाई करूनही त्यांचे कौतुक तर सोडाच, पण त्यांच्या या यशाची साधी दखलही कुणी घेतलेली नाही. विशेष म्हणजे, या विजेत्यांमध्ये सुवर्णनाथ रॉय या मुंबईकर विद्यार्थ्यानेही सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा सुवर्णनाथ रॉय हा इयत्ता दहावीतला विद्यार्थी मुंबईतल्या भांडूप इथला रहिवासी आहे. गेल्या तीन वर्षांपासून मी या ऑलिम्पियाड स्पर्धेची तयारी करत होतो. देशाच्या वतीने जेव्हा मी सुवर्णपदक स्वीकारले तेव्हा तो माझ्या आयुष्यातला सर्वाधिक आनंदाचा क्षण होता.

सहा विद्यार्थ्यांनी विश्‍वास सार्थ ठरवला
आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड ही स्पर्धा यंदा 12 डिसेंबर रोजी नेदरलँड्समध्ये आयोजित केली होती. 50 देश सहभागी झालेल्या यंदाच्या स्पर्धेची मुख्य थीम जलसंवर्धन ही होती. या स्पर्धेसाठी भारतातील सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या सहाही विद्यार्थ्यांना अ‍ॅलन करिअर इन्स्टिट्यूटच्या प्रा. ब्रजेश माहेश्‍वरी यांचे मार्गदर्शन लाभले होते. या सहाच्या सहा विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरचा विश्‍वास सार्थ ठरवत पदकांची लूट केली आहे. मुदिता गोयल, अखिल जैन, सुवर्णनाथ रॉय, कुणाला सामंता यांना सुवर्णपदके तर नियती मेहता आणि आदर्शराज सहा या दोन विद्यार्थ्यांना रजत पदके मिळाली आहेत.