ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्यासह सहकलाकारांविरुध्द तक्रार दाखल

0

पाटना : ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपटचा ट्रेलर २७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाल्यानंतर वादात सापडला आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्यासह सहकलाकारांविरोधात बिहारच्या न्यायलयात तक्रार दाखल करण्यात आली. या चित्रपटातून काही प्रतिष्ठित लोकांची बदनामी होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

वकिल सुधीर कुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर मुख्य न्यायदंडधिकारी न्यायालयात ही तक्रार दिली आहे. न्यायालयाने तक्रार दाखल करुन घेतली असून ८ जानेवारीला या तक्रारीवर सुनावणी होणार आहे. ओझा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अनुपम खेर आणि अक्षय खन्ना यांच्यामुळे माजी पंतप्रधान डॉ. पंतप्रधान मनमोहन सिंह आणि त्यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारु यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. तसेच या चित्रपटामुळे सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. ओझा यांनी सर्व कलाकारांसह चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या विरोधातही तक्रार दिली आहे.