ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे कालवश

0

मुंबई : ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ ‘आकाशगंगा’ ‘भालू’ आणि ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ या चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. त्या 72 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या हृदयविकाराने आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते; पण वाढत्या वयोमानामुळे त्या उपचारांना प्रतिसाद देत नव्हत्या. बुधवारी अखेर त्यांची प्रणज्योत मालवली.

मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या उमाताईंचे मूळ नाव अनुसया असे होते. 1960 मध्ये आकाशगंगा या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अनेक चित्रपटांतून त्यांनी सोज्वळ भूमिका केल्या होत्या. पण ’हवास तू’ या गाण्याने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यांनी मराठीसह हिंदी, तेलगू, आणि तामिळ चित्रपटातही भूमिका केल्या होत्या. ‘गुडिया हमसे रुठेगी.’ हे हिंदी गाणंही त्यांच्यावरच चित्रित करण्यात आले होते. दरम्यान, उमाताईंच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी उमा भेंडे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाने जुन्या काळातील एका ज्येष्ठ अभिनेत्रीला चित्रपटसृष्टी मुकली, असे ते म्हणाले.