धुळे : ज्येष्ठ कवी, `कविता-रती` या काव्याला वाहिलेल्या द्वैमासिकाचे संपादक, प्राचार्य पुरुषोत्तम पाटील यांच्यावर देवपुरातील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला पुत्र प्रकाश पाटील यांनी अग्निडाग दिला. यावेळी साहित्य, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
कवी पुरुषोत्तम पाटील यांचे सोमवारी (ता. 16) रात्री निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी वाडीभोकर रोडवरील राहत्या घरापासून काढण्यात आली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी कवी पुरुषोत्तम पाटील यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत श्रध्दांजली वाहिली. अंत्यसंस्कारप्रसंगी ज्येष्ठ कवी, माजी आमदार ना. धो. महानोर, माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख, माजी आमदार प्रा. शरद पाटील, दिलीप सोनवणे, साहित्य क्षेत्रातील कमलाकर देसले, कृष्णा पाटील, सुभाष अहिरे, प्र. अ. पुराणिक, शिल्पकार सरमत पाटील, कवी जगदीश देवपूरकर, डॉ. दिलीप पाटील, आपला महाराष्ट्रचे संपादक हेमंत मदाने, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, डॉ. कृष्णा पोतदार, जयहिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, प्रा. विलास चव्हाण, प्रा. आशुतोष पाटील, माजी उपनगराध्यक्ष दिलीप साळुंखे, भूपेंद्र लहामगे, दिनकर पाटील, रत्नाकर वाघ आदी उपस्थित होते.
साहित्यात नवतेचा ध्वज नेणारे काव्य
कवी महानोर श्रध्दांजली वाहताना म्हणाले, माझ्या वाटचालीत कवी पुरुषोत्तम पाटील यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांचे आशीर्वाद पाठिशी होते. त्यामुळे यश मिळवू शकलो. त्यांनी आव्हानात्मक कविता लिहिल्या. एवढेच नव्हे, तर 1960 नंतरच्या साहित्यात नवतेचा ध्वज नेणारे काव्य लिहिले. त्यामुळे त्यांचे मराठीतील पहिल्या काही कवींमध्ये स्थान आहे. ते स्थान त्यांनी कवितेच्या बळावर निर्माण केले होते. काव्याच्या क्षेत्रात त्यांच्या कविता मैलाचा दगड आहेत. त्यांचा इतिहास आपण सुवर्णक्षरांनी लिहिला पाहिजे, असे सांगत कवी श्री. महानोर यांनी प्राचार्य पाटील यांच्याविषयी असलेल्या विविध आठवणींना उजाळा दिला.
पाटील यांचे कवितेवर प्रेम
प्राचार्य पाटील यांचे कवितेवर प्रेम होते. त्यांचे व्यक्तिमत्व प्रसिध्दीपराड्मुख होते. त्यांनी आयुष्यभर मराठी वाड्मयाची सेवा केली. त्यांच्यामुळेच आपण लिहिते झालो, अशा शब्दात डॉ. देशमुख यांनी श्रध्दांजली अर्पण केली. समाजप्रबोधन करणारा कवी, विद्यार्थी घडविणारा शिक्षक, आयुष्यभर कवितेवर प्रेम करणारे कवी, साहित्याचे चालते- बोलते विद्यापीठ, साहित्य क्षेत्रात अजरामर कामगिरी करणारे कवी, निवृत्तीनंतर मोठ्या प्रमाणात लिखाण करणारे साहित्यिक कवी, साहित्याला वाहून घेतलेले प्राचार्य पाटील, अशा शब्दात प्रा. पाटील, श्री. सोनवणे, श्री. देवपूरकर, शंकरराव थोरात, श्री. देसले आदींनी श्रध्दांजली वाहिली. यावेळी कवी पुरुषोत्तम पाटील यांच्या `विसावा` या कवितेचे वाचून करुन आदरांजली वाहण्यात आली.