भोसरी : पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात स्वतंत्र कार्यालय देण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक धोरणांतर्गत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. यासह ज्येष्ठांना विविध सोयी-सुविधा देण्यात येणार असल्याचे, महापौर राहुल जाधव यांनी सांगितले. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, सभागृह नेते एकनाथ पवार, शिक्षण समिती अध्यक्षा प्रा.सोनाली गव्हाणे, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, उषा मुंढे, आरती चोंधे, निर्मला कुटे, साधना मळेकर, अश्विनी जाधव, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रविण आष्टीकर व शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजी-आजोबा हे ज्ञानपीठ
आमदार महेश लांडगे म्हणाले की, शहराच्या जडण-घडणीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोलाचा वाटा आहे. या नागरिकांचा अनुभव खूप मोठा असतो. त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेऊन विकासकामे मार्गी लावण्यासाठी मदत होणार आहे. जास्त उन्हाळे पावसाळे पाहीले असल्याने त्यांचे ऐकून घेऊन त्यानुसार आपण काम केले पाहिजे. ज्यांच्या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी तर त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेतला पाहिजे. आज आपल्या मुलांवर संस्कार करण्याचे काम हे ज्येष्ठ नागरिक करीत असतात. त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात ठेवून मुलांना संस्कारांपासून दूर ठेवू नका. आजी-आजोबा हे जगातील सर्वात मोठे आणि अखंड ज्ञान देणारे ज्ञानपीठ असतात. त्यांचे शिक्षण नसले तरीही त्यांचे अनुभव असतात. त्यावर आपले जीवन यशस्वी होईल, यात वादच नाही.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या विविध मागण्यांपैकी बहुतांशी मागण्या महापौर राहूल जाधव यांनी मान्य केल्या. तर काही निर्णय धोरणात्मक असल्याने त्यावर सभागृहाची मान्यता घ्यावी लागेल, असे यावेळी स्पष्ट केले. तसेच काही उपक्रम ‘सीएसआर’ अंतर्गत राबविण्याचे आश्वासन दिले.