बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा ज्योतिषशास्त्रावर असलेला विश्वास काही लपून राहिलेला नाही. पण ज्योतिषाचं ऐकून कुमारस्वामी यांनी चक्क सरकारी कार्यक्रम रद्द केल्याचं उघडकीस आल आहे. कुमारस्वामी यांना ज्योतिषाने मंगळवारी दुपारपर्यंत घराबाहेर पडू नका असं सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुपारपर्यंतचे सर्व कार्यकम पुढे ढकलले.
कुमारस्वामी यांच्या पक्षाकडून मात्र हे वृत्त फेटाळले आहे. ‘कुमारस्वामी यांचे कुटुंबीय प्रत्येक अमावस्येला पूजा करतात. सोमवारी अमावस्या होती. ती मंगळवारी सकाळपर्यंत चालली असावी म्हणून त्यांना सकाळचे कार्यक्रम रद्द करावे लागले’, असं पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. तर ‘कुमारस्वामी हे रामनगरच्या निवडणुकीबाबत पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चेत व्यग्र होते. त्यामुळे ते मंगळवारी सकाळी आपल्या नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहू शकले नाहीत’, असं मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कुमारस्वामी हे त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार मंगळवारी सकाळी दहा वाजता दीनदयाळ नायडू यांच्या जयंतीच्या सोहळ्यात उपस्थित राहणार होते. याशिवाय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं स्वागत करण्यासाठी ते विमानतळावर जाणार होते. मात्र, त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले व उपराष्ट्रपतींचं स्वागत करण्यासाठी मंत्री बंदेप्पा कशेमपूर यांना पाठवलं.