माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी प्रमुख पदाधिकार्यांमध्ये बैठकीत भरला उत्साह
भुसावळ- झटून कामाला लागा, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची युती झाल्याने शिवसेना पदाधिकार्यांसह आठवले गटाशी समन्वय साधा, मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी वाढवा, तेव्हा युती झाली नसल्याने भाजपाचा मुख्यमंत्री झाला मात्र आता भाजपा सरकार आल्यास युतीमुळे सेना-भाजपाचा मुख्यमंत्री म्हणाले लागणार असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे सांगितले. बुधवारी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकार्यांची खउसे फार्म हाऊसवर बैठक झाली. भाजपाने जळगावसह रावेर लोकसभेसाठी उमेदवारांची अद्याप निश्चिती केलेली नसतानाच विविध चर्चांनादेखील ऊत आला आहे तर खडसेंनी बुधवारच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये बैठकीत जोश भरल्याने रक्षा खडसे या रावेर लोकसभेच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार राहतील या शक्यतेने जोर धरला आहे.
बैठकीमुळे पदाधिकार्यांमध्ये उत्साह
माजी मंत्री खडसेंच्या फार्म हाऊसवर झालेल्या बैठकीत रावेर लोकसभेतील प्रमुख पदाधिकारी तसेच सहा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती होती. प्रसंगी खडसे यांनी पेज प्रमुखांचे संमेलन मुक्ताईनगरात 17 रोजी, 21 ला चोपड्याला, 23 ला भुसावळला तर 25 ला रावेर येथे होणार असल्याचे सांगितले. प्रत्येक संमेलनाला साधारणतः दहा हजारांवर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. विधानसभा स्तरावर निवडणूक समिती स्थापन करण्यासाठी 18 व 20 रोजी बैठक घेण्याचेही ठरले तसेच 1 एप्रिल रोजी निवडणूक कार्यालय सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
हेवेदावे काढून कामाला लागा
लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती झाली असून काही हेवे-दावे असल्यास ते बाजूला काढून शिवसेना व आठवले गटांच्या पदाधिकार्यांशी संवाद साधून झटून कामाला लागा, असे आवाहन प्रसंगी माजी मंत्री खडसेंनी केले. मतदार नोंदणी मोहिम सुरू असल्याने अधिकाधिक मतदार वाढवा तसेच शासनाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचवण्याचे त्यांनी आवाहन केले. सूत्रसंचालन भाजपाचे संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी केले.