नगरसेवक राहुल जाधव यांचे वृक्षप्रेम
पिंपरी : यंदा सूर्य आग ओकत असल्याने झाडांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. त्यातच महापालिकेच्या उद्यान विभागाकडे असलेली मनुष्यबळाची वानवा, मुबलक पाणी यंत्रणेचा अभाव यामुळे झाडांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक राहुल जाधव यांनी पुढाकार घेत पाण्याचा टँकर उपलब्ध करुन दिला आहे. एवढेच नव्हे तर झाडांना पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतःची यंत्रणा उपलब्ध करुन दिल्याने ऐन उन्हाळ्यातही स्पाईन रोड तसेच चिखली परिसरात हिरवीगार झाडे पहायला मिळत आहेत.
झाडांसाठी पुर्नवापर केलेले पाणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने उद्यानांबरोबरच शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे लावली आहेत. रस्ता दुभाजकांमध्येही झाडे लावत सुशोभिकरण करण्यात आले आहे. ही हिरवळ टिकवण्यासाठी महापालिकेकडून मैलाशुध्दीकरण प्रकल्पांमध्ये प्रक्रिया झालेल्या सांडपाण्याचा पुर्नवापर केला जातो. काही ठिकाणी बोअरवेलचे पाणी वापरले जाते. मात्र, बोअरवेलच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने अनेक बोअरवेल बंद पडल्या आहेत. त्यामुळे उद्याने, झाडे यांना पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यातच महापालिकेच्या उद्यान विभागाकडे मनुष्यबळाची वाणवा आहे. काही ठिकाणी ठेकेदारामार्फत झाडांना पाणी पुरवठा व देखभाल केली जाते. मात्र, ठेकेदारांचेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
पाणी देण्याचा उपक्रम
यंदाच्या तीव्र उन्हाचा त्रास झाडांनाही होत आहे. मात्र, त्यासाठी महापालिका अथवा ठेकेदाराची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच झाडांना पाणी पुरवठा करुन त्यांच्या संरक्षणाचा संकल्प चिखली प्रभागाचे भाजपचे नगरसेवक राहुल जाधव यांनी सोडला. त्यांनी स्वतःचा टँकर उपलब्ध करुन दिला. तसेच बोअरवेलच्या पाण्याचा वापर करुन स्वतःचे मनुष्यबळ देत रस्ता दुभाजकातील झाडांना पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम स्पाईन रोडसह चिखली प्रभागात दिसून आला. शहरातील इतर भागातील हिरवळ उन्हाने मलूल झाल्याचे चित्र असताना या भागात झाडांची हिरवळ कायम दिसून आली. वृक्षप्रेमींनी नगरसेवक जाधव
माझा प्रभाग माझे कुटुंब
नगरसेवक राहुल जाधव म्हणाले की, तीव्र उन्हाचा फटका मानव, पशु-पक्ष्यांबरोबरच झाडांनाही बसत आहे. महापालिकेने रस्ता सुशोभिकरणासाठी लावलेली झाडे, हिरवळ कोमेजून जाण्याचा धोका होता. सर्वच बाबतीत महापालिकेवर अवलंबून राहणे अयोग्य आहे. प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासायला हवी. माझा प्रभाग हे मी माझे कुटुंब मानतो. त्यामुळे येथील वृक्षांचे संरक्षण करणे ही माझीच जबाबदारी आहे, हे मानून मी हा उपक्रम हाती घेतला. हिरवळ पाहून एक वेगळेच समाधान मिळत आहे. आपआपल्या भागातील वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह गणेश मंडळे, सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा.