बंगळुरू – कर्नाटकमधील दोड्डाथोगुरू भागात झाडा झुडपांमध्ये फेकून देण्यात आलेल्या अर्भकाला एका महिला पोलिसाने जीवनदान दिले आहे. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्या अर्भकाला आवश्यकता असल्याने स्वतःच्या अंगावर दूध पाजले. कचरा वेचणाऱ्याला एका झाडाखाली प्लस्टिकच्या बॅगमध्ये गुंडाळलेले अर्भक दिसल्यानंतर त्याने जवळच्या दुकानदाराला याची माहिती दिली. त्यानंतर या दुकानदाराने याची माहिती पोलिसांना दिली.
घटनास्थळावर आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने अर्भकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी देखील या अर्भकावर विनामुल्य उपचार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. उपचारानंतर या अर्भाकाला पोलीस ठाण्यात नेत ३ महिन्यांच्या मुलाची आई असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल अर्चना यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यांनी आपल्या कामाच्या मर्यादेपलीकडे जाऊन त्या भुकेलल्या चिमुरड्याला आपल्या अंगावर स्तनपान दिले. त्यानंतर हे अशक्त आणि हालचाल न करणारे मुल रडायला लागले. त्यामुळे उपस्थित सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमटले. यावर आनंदी झालेल्या पोलीस कर्माचाऱ्यांनी मुलाला सरकारी मुल म्हणत त्याचे नाव कुमारस्वामी असे ठेवले.