नवी दिल्ली । क्रिकेटमध्ये भारताकडून वेगवेगळे कीर्तिमान स्थापित होत असताना भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामीने एक नवा कीर्तिमान स्थापित केला आहे. झुलन जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे. मध्यमगतीने गोलंदाजी करणार्या झुलन गोस्वामीने दक्षिण आफ्रिकेच्या राइसिब नटोजेख हिची विकेट घेऊन हा पराक्रम नोंदवला. झुलनने या सामन्यात 7.3 षटकांमध्ये 20 धावा देऊन 3 विकेट घेतल्या.
कॅथरिन पिट्जपॅट्रीकला मागे टाकले
34 वर्षीय झुलनने ऑस्ट्रेलियाची कॅथरिन पिट्जपॅट्रीक हिला मागे टाकून सर्वाधिक विकेट घेणार्या गोलंदाजाचा मान पटकावला आहे. दहा वर्षांनंतर कॅथरिनचा विक्रम मोडीस निघाला. झुलन गोस्वामीने 2002 साली आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरला सुरूवात केली होती. तिने आतापर्यंत 153 सामने खेळले असून 181 विकेट तिच्या नावावर आहेत. झुलनने दोन वेळा पाच विकेट मिळवण्याचीही किमया केली आहे. कॅथरिनने 1993-2007 पर्यंतच्या करिअरमध्ये 109 सामने खेळले आहेत. गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही तिने चमकदार प्रदर्शन केले असून कसोटीत 25.72 अशी तिची सरासरी आहे. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. 153 वनडेमध्ये तिच्या नावावर 919 धावा नोंद झाल्या असून ती अद्याप खेळत आहे. 2007 मध्ये आयसीसीचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा बहुमान मिळाल्यानंतर ती भारतीय संघाची कर्णधार बनली होती. 2010 मध्ये तिला अर्जुन पुरस्कार व दोन वर्षांनंतर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.