जळगाव। संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदेवर अखेर भाजपाचा झेंडा फडकला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता काबीज केली. नाट्यमय घडामोडीनंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कासोदा गटातून पहिल्यांदाच जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आलेल्या उज्ज्वला पाटील यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी भाजपाचेच निंभोरा-तांदलवाडी गटातून निवडून आलेले नंदु महाजन यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष निवडणुकीत सभागृहात 64 सदस्य हजर होते. यात भाजपचे 33, राष्ट्रवादी 13, शिवसेना 14, कॉग्रेसचे 4 सदस्य होते. राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांनी निवडणुकीत सहभाग घेतला नाही. त्यांच्या गैरहजेरीमुळे सभागृहाची संख्या 64 इतकी झाली त्यामुळेे बहुमताचा आकडा 33 सदस्यांचा झाला. कॉग्रेसच्या 4 सदस्यांनी भाजपाला बिनशर्त पाठींबा दिल्याने भाजपच्या मताची संख्या 37 वर पोहोचली. सेना, राष्ट्रवादी आघाडीला 27 मते मिळाली. प्रत्येकी 10 मतांच्या फरकाने भाजपाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून आले. सेना- राष्ट्रवादीतर्फे अध्यक्षपदाकरीता अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे चाळीसगाव तालुक्यातील शशिकांत साळुंखे यांनी अर्ज दाखल केला होता.
भाजपा कार्यालयात जल्लोष
अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष उज्जवला पाटील व उपाध्यक्ष नंदू पाटील याची जिल्हा परिषद कार्यालयापासून भाजपा कार्यालयातपर्यंत मिरवणूक काढण्यात आली . या मिरवणुकीत उज्ज्वला पाटील यांचे पती मच्छिंद्र पाटील यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेवून कार्यालयापर्यंत नाचत नेेले. पक्ष कार्यालयात माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसेंसोबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार ए.टी.नाना पाटील, आमदार स्मिताताई वाघ, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार उन्मेश पाटील, मावळत्या जि.प. अध्यक्षा प्रयाग कोळी, आमदार राजूमामा भोळे, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. आवारात जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार उन्मेश पाटील यांनी वाद्यावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला.
राष्ट्रवादी सदस्यांचा अपघात
जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु होती. राष्ट्रवादी कॉग्रेस, सेना, कॉग्रेस एकत्र आले असते तर अध्यक्षपदापासून भाजपा दुर राहिला असता. दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तीन सदस्यांचा इगतपुरीजवळ अपघात झाल्याने ते निवडीत सहभागी होऊ शकले नाही. तिनही सदस्य जखमी असल्याने त्यांना नाशिक येथे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. यात अमळनेर तालुक्यातील मिना रमेश पाटील, ममुराबाद-असोदा गटातील पल्लवी जितेंद्र पाटील, आत्माराम कोळी यांचा समावेश आहे. या दस्यांचा अपघात झाला की राजकीय हेतुने अनुपस्थित राहिले याविषयी तर्कवितर्क लावले जात आहे.
आता महानगरपालिका लक्ष्य
भाजपाला सत्तेवर येवू देणार नाही अशी विरोधकांची भूमिका होती. जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या सहा महिन्यात विधानसभा, विधानपरिषद व पंचायत समिती, जिल्हा परीषदेनंतर आता महानगरपालिको लक्ष्य असून तेथील सत्ताही मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, ग्रामीण व शहरी भागात भाजपचीच सत्ता राहणार आहे. भाजपाच्या माध्यमातून प्रलंबित कामे मार्गी लावणार आहोत.
– ना. गिरीश महाजन, जलसंपदामंत्री
पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामांची पावती
1197 मध्ये पहिल्यांदा पक्षाला जि.प.अध्यक्ष पद मिळाले होते. सुरूवातीला जि.प.वर 1196 मध्ये 14 सदस्य निवडून आले, त्यानंतर 26 वर गेले नंतर 25 सदस्य निवडून आले. त्यानंतर आता तब्बल 33 सदस्य भाजपाचे निवडून आले . आज जिल्हा परीषदेवर विजय हा एकट्या भाजपाच्या बळावर आहे. आत्तापर्यंत कुणाला तरी हातात घेवून सत्ता स्थापन करावी लागत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांची ही पावती आहे. वीस वर्षे व पुढची पाच वर्ष असे एकूण 25 वर्ष जि.प. भाजपाच्या ताब्यात आहेे. काँग्रेसने आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला असून त्यांनी कोणतीही मागणी केलेली नाही.
– एकनाथराव खडसे, माजी मंत्री आमदार