झेडप्लस सुरक्षा भेदुन निकमांचे मोबाईल लंपास

0

जळगाव। राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे मुंबई येथून जळगावला येत असताना पठाणकोट एक्सप्रेसच्या ए-वन या वातानुकुलीत बोगीतून दीड लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, अ‍ॅड. निकम यांना झेड प्लस सुरक्षा आहे. ही सुरक्षा भेदून चोरट्यांनी हे मोबाईल लंपास केले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे अ‍ॅड.निकम यांच्या सुरक्षेचे वाभाडे निघाले आहेत. झेडप्लस सुरक्षा असून देखील मोबाईल चोरीला गेल्याने आश्‍चर्यच व्यक्त केले जात आहे.

सुरक्षा रक्षकही झोपले
रात्री बंदोबस्ताला असलेले झेड प्लस सुरक्षेतील सुरक्षा ताफ्यातील रक्षकांचेही डोळे लागले होते. पुढे मनमाड येथून सुरक्षा रक्षकांचा ताफा बदलला, नंतर तेही झोपले होते. त्यामुळे दोन्ही मोबाईल हे कल्याण ते मनमाड दरम्यान चोरीस गेले की मनमाड ते पाचोरा दरम्यान हे स्पष्ट होवू शकले नाही. सकाळी साडे सहा वाजता जळगाव स्थानकावर उतरल्यावर अ‍ॅड.निकम यांनी लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुध्द भुसावळला गुन्हा दाखल करण्यात आला.

जाग आल्यावर आले लक्षात
गाडी क्रं.110/57 दादर-अमृतसर एक्सप्रेस या पठानकोट एक्सप्रेसच्या ए-वन या वातानुकुलित बोगीत 38 क्रमाकांचे सीट त्यांचे आरक्षित होते. शनिवारी रात्री ते दादर येथून जळगाव येण्यासाठी या एक्सप्रेसमध्ये बसले. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईचा सुरक्षा ताफा होता. कल्याण स्टेशन सोडल्यानंतर अ‍ॅड.निकम हे आपल्या सीटवर झोपले. पहाटे सहा वाजेच्या सुमारास पाचोरा स्टेशन आल्यावर जाग आली असता अ‍ॅपल कंपनीचा 90 हजार रुपये किमतीचा एक व दुसरा 60 हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरी झाल्याचे निकम यांच्या लक्षात आले.

मोबाईलचे नाशिक लोकेशन
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचे तपास चक्रे वेगाने फिरले. त्यांनी केलेल्या तांत्रिक चौकशीत दोन्ही मोबाईल हे नाशिकला बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे चोरटे हे नाशिकला उतरल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांनी टाडा, अजमल कसाब यासारख्या दहशवादी गुन्ह्यांच्या खटले लढविले आहेत. त्यात आरोपींना फाशीच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. त्यातील बहुतांश दहशतवादी असो की गुन्हेगार यांना फाशीही देण्यात आली आहे. संवेदनशील खटल्यात त्यांनी सरकारची बाजू मांडली आहे, त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान केली आहे. असे असताना या सुरक्षा व्यवस्थेतही त्यांचे मोबाईल चोरी होताहेत हे विशेष