झेड.पी. सीईओ घेणार दर शुक्रवारी आढावा

0

जळगाव। जिल्हा परिषदे मार्फत राबविण्यात येणार्‍या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचे उद्दीष्ट पुर्ण होत नसल्याची स्थिती आहे. या योजना वेळेत पुर्ण व्हाव्यात या उद्देशाने योजनांचा दर शुक्रवारी आढावा घेण्याचे पत्रक सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी शनिवारी काढले आहेत.स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजन जिल्हापरिषदे मार्फत राबविल्या जातात. केंद्र शासनामार्फत या योजना राबविल्या जात असल्याने शासनस्तरावरुन याचा नियमित पाठपुरावा घेतला जात असतो. मात्र योजनांच्या उद्दीष्टांमध्ये जिल्हा कायम पिछाडीवर राहत असल्याचे चित्र दिसुन येते.

कामकाजात दिरंगाई करणार्‍यांची हयगय नाही
यामुळे योजनांचा आढावा हा मासिक बैठकांमध्ये न घेता, दर आठवड्याला घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे दर शुक्रवारी माहिती तंत्रज्ञान कक्षाकडे प्रगतीचा अहवाल तालुकानिहाय सादर करण्याच्या सुचना विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याची माहिती सादर करताना राज्यस्तरावरील श्रेणीनुसार सादर करावी. स्वच्छभारत अंतर्गत हगणदारीमुक्त गावांची माहिती, फोटो अपलोडींगची माहिती, तसेच मंजुर प्रदान स्थिती, घरकुलाच्या माहितीत लक्षांक, मंजुरी, अदा केलेले हफ्ते तसेच एकुण साध्य व उद्दीष्टपुर्तीची टक्केवारी याची माहितीही सादर करण्यासह या कामी कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सुचनाही सीईओंनी पत्रकाद्वारे केल्या आहेत.