भुसावळ ते जळगाव लाँग मार्च मोर्चा ; पुर्नवसनावर मोर्चेकरी ठाम
भुसावळ- शहरातील रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी बचाव समर्थनार्थ सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र जमले असून शनिवारी सकाळी 11 वाजता आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्राऊंडवरून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे पदाधिकारी म्हणाले. जळगावचे उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या उपस्थितीत शहर पोलीस ठाण्यात पदाधिकार्यांनी चर्चा केली.
पुर्नवसनाबाबत लेखी हमी द्यावी
मजदूर सेनेचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे व पीपल्स रीपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी झोपडपट्टी हटवायची असल्यास आधी पुर्नवसनाबाबत जिल्हा प्रशासनाने लेखी हमी देण्याची मागणी केली. शनिवारच्या मोर्चात सहा हजारांहून अधिक नागरीक सहभागी होणार आहेत. तहसीलदार तसेच स्थानिक प्रांताधिकार्यांनी पुनर्वसनासंदर्भात जिल्हाधिकार्यांकडे अहवाल पाठवला नसल्याचा आरोप प्रसंगी करण्यात आला. सकाळी 11 वाजता डी.एस.ग्राऊंडपासून आंदोलनाला सुरुवात होईल. शहर पोलीस ठाणे, बाजारपेठ, जामनेर रोड मार्गे आंदोलनकर्ते नाहाटा चौफुलीवरून नशिराबादमार्गे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर रवाना होतील. प्रसंगी आंदोलनकर्ते स्वतःला अटक करवून घेणार आहेत.
लोकप्रतिनिधींनी राजीनामा देण्याची मागणी
झोपडपट्टी पुर्नवसनासंदर्भात शहराचे आमदार, खासदार तसेच भाजपाच्या नगरसेवकांनी कुठलाही पाठपुरावा शासनाकडे तसेच केंद्राकडे न केल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जगन सोनवणे यांनी केली. झोपडपट्टी धारकांचे पुर्नवसन करून त्यांना सातबारा देण्याची मागणी प्रसंगी करण्यात आली. यावेळी सुदाम सोनवणे, मुन्ना सोनवणे, शरद सोनवणे, सिद्धार्थ सोनवणे, राजू तायडे, मनोहर सुरडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त -सचिन सांगळे
आंदोलकांच्या पार्श्वभूमीवर दोन पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक निरीक्षक, ईआरटी पथकासह आरसीपी पथकाचा बंदोबस्त असणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे म्हणाले. संबंधितावर आम्ही कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक नोटीसादेखील देणार असल्याचे त्यांनी सांगितले.