चिखली घरकुल प्रकल्पातील धक्कादायक प्रकार उघडकीस
चिखली : पिंपरी-चिंचवड शहर पूर्णपणे झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने केंद्राच्या जेएनएनयुआरएम योजनेतून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात आली. तसेच शहरात नवीन झोपड्या निर्माण होऊ नयेत म्हणून आर्थिकदृष्ट्या परवडणारी घरे, आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात आली. त्यानुसार केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक मदतीने शहरात 13 हजार 250 नवीन घरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला. या घरकुल प्रकल्पात सुमारे 465 चौरस फुटांच्या सदनिका शहरातील गोरगरीब, प्रकल्प बाधित, असंघटीत कामगारासाठी बांधण्यात आल्या. परंतु, चिखली येथील आर्थिक दुर्बल घटकांच्या घरकुल योजनेतील 504 लाभार्थ्यांची माहिती अधिकारातून माहिती मागवण्यात आली असता, या माहितीतून सुमारे 249 लाभार्थ्यांची कागदपत्रे योजनेच्या नियमाप्रमाणे जोडली नसल्याचे उघड झाले आहे. तसेच त्यांचे पुरावेदेखील झोपडपट्टी पुनर्वसन विभागास सादर केले आहेत. त्यामुळे त्या बोगस लाभार्थ्यांची घरे जप्त करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
कागदपत्रांचे पुरावे ‘झोनिपू’कडे सादर
सर्वसामान्य लोकांना वरदान ठरणार्या घरकुल योजनेत गरजू गोरगरिबांना हक्काचे घर प्राप्त होणे आवश्यक होते. तसेच या योजनेत खरे लाभार्थी पात्र ठरविण्याऐवजी अनेक अपात्र लाभार्थ्यांना कागदपत्राची योग्य छाननी न करता लाभ दिला आहे. त्यामुळे खरे लाभार्थी कित्येक वर्षे झाले घरापासून वंचित राहिले आहेत. झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाने 504 व्यक्तीचा घरकुल लाभ देण्यासाठी बायोमेट्रीक करुन त्यांना घरकुल देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. परंतु, त्या 504 व्यक्तींची माहिती अधिकारातून माहिती मागविण्यात आली. त्या व्यक्तींचे फॉर्म तपासले असता, 249 व्यक्ती सदरील घरकुल योजनेतील लाभार्थी नसून त्यांनी योजनेच्या नियमाप्रमाणे कागदपत्रे जोडली नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत त्या 249 व्यक्तींची यादी झोनिपू विभागाकडे पुराव्यानिशी सादर केली आहेत. त्या व्यक्तींनी घरे मिळविण्यासाठी कशाप्रकारे बोगसगिरी केली, हे त्यांच्या कागदपत्रातून उघड होत आहे. या योजनेची खर्याअर्थाने फेरतपासणी करणे गरजेचे आहे. प्रत्येक लाभार्थ्यांची सखोल चौकशी केल्यास सर्व बोगस लाभार्थी सापडतील, अशी तक्रारही आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
चौकशी पूर्ण झाल्याशिवाय ताबा देऊ नका : बाबा कांबळे
चिखलीतील घरकुल योजनेचा लाभ मिळविण्यासाठी 504 व्यक्तींपैकी 249 व्यक्तींची कागदपत्रे योजनेच्या नियमाप्रमाणे नसल्याचे आढळले आहेत. या सर्व बोगस लाभार्थ्यांची चौकशी पुर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना घरकुलाचा ताबा देण्यात येवू नये, बोगस कागदपत्रे देवून घराचा लाभ घेणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांचे घरकुल रद्द करण्यात यावे, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतीचे सरचिटणीस धर्मराज जगताप, महिला अध्यक्षा शोभा शिंदे, रवी शेलार, राम पल्हारे यांनी केली आहे. तसेच, शहरातील कष्टकरी, मजूर व भाड्याने राहणार्या बेघर कुटुंबीयांना खर्याअर्थाने घरकुल योजनेत लाभ मिळायला हवा, परंतु, झोनिपू विभागातील अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे गोरगरीब नागरीक घरापासून वंचित आहे. त्यामुळे बोगस कागदपत्राद्वारे घरांचा लाभ घेणार्यांची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांचा करारनामा व इतर कागदपत्रे तयार करु नयेत, असे आवाहन कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले आहे.