टंचाई नियोजनाचे महापौर महालेंचे आदेश

0

धुळे। शहरात सध्या पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले असून नकाणे तलावासह शहराला पाणी पुरवठा करणार्‍या हरणमाळ तलावातील पाण्याची स्थिती बघता पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी महापौर कल्पना महाले यांनी तातडीने बैठक घेवून नियोजन करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत. धुळे शहरात 40 टक्के भागास नकाणे तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो, सद्याच्या स्थितीत नकाणे तलावात 30 एमसीएफटी तर हरण्यामाळ तलावात 20 एमसीएफटी ऐवढा अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नाही. किरकोळ पाऊस पडत असल्याने जलसाठ्यात वाढ झालेली नसून यामुळे मोठे संकट निर्माण झाले असल्याने बैठक बोलविण्यात आली होती. नकाणे तलाव आणि हरणमाळ तलावातील पाणीसाठ्यातून शहराला जेमतेम 15 ते 20 दिवस पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. आगामी पाऊस झाला नाही तर तापी योजनेव्दारेच संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करावा लागेल. त्या दृष्टीने पाणीपुरवठ्याचे नियोजन आतापासूनच करावे यासाठी शुक्रवारी सकाळी महापौर कल्पना महाले यांच्या दालनात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी ओव्हरसिअर यांची तातडीची बैठक घेण्यात आली.

नगावबारी येथून पाणीपुरवठ्याचा पर्याय
सद्यस्थितीत नकाणे तलाव येथून हनुमान टेकडीव्दारे कुमारनगर, अशोकनगर, सिमेंट जलकुंभ, रामनगर जलकुंभ भरण्यात येवून शहरातील 40 टक्के भागास पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती दिली गेली. नकाणे तलावातील पाणीसाठा संपुष्ठात आल्यास तापी योजनेव्दारे पाणीपुरवठा करण्यासाठी नगावबारी येथून रामनगर जलकुंभाव्दारे हनुमान टेकडी येथे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच नगांवबारी येथून नेहरुनगर जलकुंभ व पांझरा पंपींग स्टेशन आणि सिमेंट जलकुंभ भरण्यात येणार आहे. त्यासाठी तापी योजना येथील पंपाची स्थिती वहन क्षमता तपासून ते सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश महापौरांनी संबंधीत अधिकार्‍यांना यावेळी दिले.

विंधन विरहीची दुरूस्ती करणार
नियोजन करतांना शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेवर पडणारा ताण लक्षात घेवून पाणी वाटपाच्या नियोजनाचा कालावधी वाढवावा लागणार आहे. सध्या शहरात दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत असून त्यात वाढ केली जाऊ शकते. तसेच पाणी टंचाईचा सामना नागरीकांना करावा लागू नये यासाठी मनपाच्या मालकीच्या शहरातील 7 विहीरी व अन्य खासगीविहिरीव्दारे पाणीपुरवठा करण्यावर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. मनपा मालकीच्या विंधन विहिरीची आवश्यक ती दुरुस्ती करण्याचे आदेश यावेळी महापौर कल्पना महाले यांनी दिले.

काटकसरीने पाणी वापरा
नागरीकांनीही पाणी जपून वापरावे, कामाशिवाय पाणी वाया घालू नये आणि काळजी घ्यावी असेही आवाहन यावेळी महापौर कल्पना महाले यांनी केली आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून तापी लाईनवरील गळत्या व शहरातील विविध भागातील पाईपलाईलमधून होणार्‍या लिकेजेस युध्दपातळीवर दुरुस्त करण्याचे आदेश देखील यावेळी महापौरांनी दिले आहेत. या बैठकीला जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत सोनार, अभियंता कैलास शिंदे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि ओव्हरसिअर उपस्थित होते.