पिंपरी : चहाच्या टपरी समोर कार लावल्याचा जाब विचारल्यावरून तिघांनी मिळून टपरी चालकाला मारहाण केली. यामध्ये टपरी चालक जखमी झाला. ही घटना शनिवारी घडली. नितीन नंदकुमार मेश्रा (वय 39, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार कारमधील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन यांची संत तुकाराम नगरमधील पीसीएमसी गार्डन डेपो येथे त्रिरत्न टी सेंटर नावाची चहाची टपरी आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी वॅगन आर (एम एच 14 / 2852) कार मधून आले. त्याने नितीन यांच्या टपरी समोर कार लावली. त्यामुळे त्यांना अडथळा झाला. याचा जाब नितीन यांनी कार चालकाला विचारला असता त्याने त्याच्या दोन साथीदारांना बोलावून नितीन यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यातील एकाने नितीन यांच्या डोक्यात दुधाचा ट्रे डोक्यात मारला. यामध्ये नितीन जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.