टपर्‍यांच्या विळख्यात गुदमरतोय रुग्ण, विद्यार्थ्यांचा जीव!

0

ठोस कारवाईची नागरिकांची मागणी

पिंपरी-चिंचवड(बापू जगदाळे) : संत तुकारामनगर मधील एका टपरीधारकाने प्रभागातील राजकारण्यांच्या शह कटशहाच्या राजकारणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महात्या केली. असाच काही प्रकार शहरातील अन्यभागात देखील आहे. प्रभागातील प्रत्येक राजकारण्यांना टपरी हा विषय अत्यंत जीव्हाळ्याचा बनला आहे. त्याला कारण ही तसेच आहे. कारण यातुन मासिक मिळणारे लाखो रुपयांचे बीनभांडवली उत्पन्न! यातुनच प्रभागातील भिन्न पक्षाच्या राजकारण्यांचा उडणारा संघर्ष आता नवा राहीला नाही. पण आता याला जीवण मरणाची देखील किनार तुकारामनगर मधील आत्महात्या प्रकरणामुळे लाभली आहे. ही येथून पुढे अनाधिकृत टपर्‍या उभ्या राहु नये म्हणून काळजी न घेणार्‍या पालिका प्रशासनाला धोक्याची घंटा आहे. असे असले तरी सध्या या परिसरात वावरणार्‍या विद्यार्थ्यांचा व रुग्णाचा जीव या टपर्‍यांच्या विळख्यात गुदमरतोय हे मात्र नक्की. यामुळे यावर ठोस कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे.

टवाळखोरांचा त्रास विद्यार्थ्यांनाही
संत तुकारामनगरमध्ये महापालिकेचे वायसीसीएम रुग्णालय, डी. वाय.पाटील रुग्णालय, डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल आहे. या भागात शहराबाहेरून येणार्‍या नागरिकांचा वावर अधिक असतो. तसेच परराज्यातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. या परिस्थितीचे भांडवल करून या भागात खाद्यपदार्थ व त्यासंबधी अनेक बेकायदा व्यवसाय चालतात. जागा मिळेल तिथे अनधिकृतपणे उभारलेल्या टपर्‍या आणि बेशिस्त वाहतुकीमुळे रुग्णवाहिकांना ये-जा करण्यासाठीही रस्ता मिळत नाही. अशा वेळी तत्काळ उपचाराची गरज असणार्‍या रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्याने त्याच्या जीवावर बेतू शकते. तसेच टपर्‍यांभोवती बसलेल्या टवाळखोरांचा त्रासही विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. प्रशासनाने बेकायदा टपर्‍यांच्या विळख्यातून संत तुकारामनगरची सुटका करावी, अशी मागणी नागरिक व विद्यार्थ्यांमधून होत आहे.

कारवाईची नागरिकांची मागणी
या भागाचे व्यावसायिक महत्त्व ओळखून काही संधीसाधू लोकप्रतिनिधी अनधिकृत टपर्‍यांच्या माध्यमातून लोखो रुपयांची माया गोळा करत आहेत. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे राजकीय समिकरण सर्वसामान्यांच्या मुळावर उठले आहे. या प्रभागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राजकीय वजन वापरून महानगरपालिका प्रशासनाला देखील आपल्या हातचे बाहुले बनवून खेळवले जात आहे. दरम्यान, या सर्व टपर्‍यांवर सरसकट कारवाई करण्याची कठोर कारवाई पालिका प्रशासणाने करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

प्रदुषणाचा विळखा वाढला
परिसरातील ज्येष्ठ नागरिक विठ्ठल माने म्हणाले की, सध्या या टपर्‍यांमुळे रस्ते अरुंद होऊन येथील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच येथील एकही उद्यान लगत रस्ता या टपर्‍यांमुळे मोकळा नसून प्रदुषणाचा देखील विळखा वाढला असून नागरीकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे. व त्यातच हे टपर्‍यांचे राजकारण आता जीवावर बेतत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कुणाचीही परवा न करता सरसकट येथील सर्वच टपर्‍या जमीनदोस्त कराव्या. नाहीतर आम्हीच यावर उपाय करु. कायद्याला धाब्यावर बसवून लोकप्रतिनिधी आपले उखळ पांढरे करण्यात मशगुल आहेत. अनधिकृत टपर्यांमुळे किती वाईट गोष्टी घडत आहेत. त्याचा समाज जीवनावर किती विपरीत परिणाम होत आहे, हे न समजण्याएवढे ते लहान नाहीत.