हफ्तेवसुलीला आळा बसण्याची भिती
पिंपरी : पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे अतिक्रमण पथकाच्यावतीने अवैध टपरीधारकांवर कारवाई सुरु आहे. 3 मे पासून या अतिक्रमण मोहिमेला सुरूवात कऱण्यात आली असून 89 आतापर्यंत अनधिकृत टपर्यांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेचा कुठलाही पुरावा नसलेल्या टपर्या, हातगाड्या, पत्राशेड, टेम्पो काढून महापालिकेने काढून टाकल्यात. तर 15 टपर्या या नागरिकांनी स्वतःहून काढल्या आहेत. मात्र टपर्या हाटविल्यावर आपली हफ्तेवसुली बंद होण्याच्या भितीमुळे परिसरातील राजकारण्यांचा टपर्यांवरील कारवाई रोखण्यासाठी आटापिटा सुरु झाल्याचे दिसून येत आहे. या सर्वांचा त्रास कारवाई अधिकार्यांना होताना दिसून येतोय.
आयुक्तांच्या सर्व्हेच्या सूचना
यापूर्वी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना अनेक अनधिकृत टपर्या उभारण्यात आल्या होत्या. त्या हटविण्यात याव्यात, अशी मागणी संबंधित प्रभागातील नगरसेविकेने केली होती. मात्र आयुक्तांनी पूर्ण संत तुकाराम नगरचा सर्व्हे करण्याच्या सुचना अधिकार्यांना दिल्या होत्या. त्यानुसार अधिकार्यांनी सर्व्हे केला. त्या सर्व्हेनुसार कारवाई मोहिम हाती घेतली आहे. ज्या टपर्या, हातगाड्यांकडे महापालिकेचा कुठलाही पुरावा नाही अशाच त्याच टपर्यांवर कारवाई कऱण्यात आली. पंधरा दिवस आधी या टपर्यांवर ‘टीकमार्क’ करण्यात आला होता. त्यामध्ये काही टपऱीधारकांकडे 2005 पूर्वीची जुनी लाईसन्स असल्यामुळे त्यांनाही यादीतून वगळण्यात आले आहेत. 2012 ते 2014 दरम्यान अशी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी टपऱीधारकांना महापालिकेत अर्ज करून लाईसन्स काढण्यास सांगितले होते. त्यामध्ये अनेकांना लाईसन्सही मिळाले आहे. मात्र त्यावेळी लाईसन्स मिळाले नाही त्यांनाही यादीतून वगळण्यात आले आहे. आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार कारवाई कऱण्यात आली असल्याची माहिती ह प्रभाग अधिकारी आशा राऊत यांनी दिली.
अधिकार्यांची पूर्वसूचनेनुसार कारवाई
प्रभागातील कार्यकर्त्यांच्या टपर्यांवरील कारवाई थांबवावी या मागणीसाठी नगरसेविका सुजाता पालांडे यांनी आमदार आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली होती. मात्र अनधिकृत टपर्यांवरील कारवाई रोखण्यासाठी आपण काही करू शकत नसल्याचे जगताप यांनी सांगितले. त्यामुळे टपर्यांवरील कारवाई योग्य पध्दतीने व्हावी यासाठी नगरसेवकांनी अधिकार्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकार्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता टपरी चालकांना पुर्वकल्पना देऊन कारवाई केली आहे.