टाकळीच्या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टर पतीला अटक

0

भुसावळ- चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा.येथील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या विवाहितेने पतीसह सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल होता मात्र आरोपी पती गुंगारा देत असल्याने त्याचा कसून शोध सुरू होता. मंगळवारी आरोपी घरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव पोलिसांच्या पथकाने बाजारपेठ पोलिसांची मदत घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. डॉ.चेतन सुरेश सूर्यवंशी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीस बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

लग्नाच्या महिनाभरानंतरच छळाला सुरुवात
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा.येथील डॉ.स्मिता चेतन सूर्यवंशी (24) या विवाहितेचा विवाह भुसावळचे डॉ.चेतन सूर्यवंशी यांच्याशी 14 डिसेंबर 2017 रोजी चाळीसगावच्या पाटीलदार मंगल कार्यालयात झाला होता. लग्नाच्या महिनाभरानंतर सासरच्यांनी छळ सुरू केल्याने डॉ.स्मिता या माहेरी वडिल अर्जुन नागो खैरनार यांच्याकडे आल्या होत्या. सासरच्या छळाला कंटाळून त्यांनी 27 रोजीच्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास बेडरूममध्ये साडीने गळफास घेवून आत्महत्या केली होती. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसात आरोपी पती डॉ.चेतन, सासरा सुरेश पांडुरंग सूर्यवंशी, सासु मिनाबाई सुरेश सूर्यवंशी व दीर विराज सुरेश सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी पती पसार झाल्याने त्याचा कसून शोध सुरू होता. मंगळवारी तो भुसावळातील घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेश घोळवे, गोवर्धने बोरसे, गोपाळ बेलदार, सुनील राजपूत, राहुल गुंजाळ आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीस बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.