साक्री । साक्री आगारातील 20 एसटी बसेसना टायर नसल्याने 18 मार्च रोजी दै.जनशक्ती वृत्तपत्राने बातमी प्रसारित करताच आज साक्री आगारात 30 टायर दाखल झाले आहेत व बसेसना टायर बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. 20 बसेस गेल्या दीड महिन्यापासून साक्री आगारात धूळ खात पडल्या होत्या. आजपासून पुन्हा बसेस रस्त्यांवर धावतांना दिसून येतील,या सुखद बातमीमुळे प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. साक्री आगारात एकूण 105 एसटी बसेस आहेत त्यापैकी 80 बसेस दैनंदिनी रस्त्यांवर धावत होत्या. 20 ते 25 बसेस टायर अभावी साक्री आगारात धूळखात पडल्या होत्या.
साक्री-पुणे बस होणार पुर्ववत सुरू
साक्री आगारातील तब्बल 20 एसटी बसेस टायर नसल्याने गेल्या दीड महिन्यापासून ह्या बसेस साक्री आगारात धूळखात पडल्या होत्या. या कारणामुळे जलद गतीवर धावणार्या फेर्या देखील रद्द करण्यात आल्या होत्या. साक्री-पुणे ही बस व अन्य मार्गावर धावणार्या बसेस टायर अभावी साक्री आगारात धूळ खात पडल्या होत्या. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. येत्या काही दिवसात शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागण्याची चाहुल सुरू असल्याने धुळे विभागाने तातडीने साक्री आगारातील बसेसना नवीन टायरची सुविधा उपलब्ध करून दिल्याने प्रवासी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.