आहुजानगरजवळ महामार्गावर अपघात
पाळधी येथील जैन कंपनीत होते जात
जळगाव : बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीतून पाचोरा रस्त्यावरील जैन व्हॅलीत जात असलेल्या ट्रॅक्टरचे समोरचे टायर अचानक फुटल्याने अपघात होवून ट्रॅक्टर रस्त्याखाली 15 फूट खड्डयात उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रॅक्टरमधील 7 मजूर जखमी झाले असून एकाचा पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सर्वांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने बेशिस्त लावलेल्या वाहनांमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
जैन कंपनीने कामाचा ठेकेदाराला मक्ता दिला आहे. या ठेकेदाराकडील 7 मजूर शुक्रवारी सकाळी ट्रॅक्टर (क्र. एम.व्ही.डी. 9749) ट्रॉलीमध्ये बसून साहित्य घेण्यासाठी बांभोरी येथील जैन इरिगेशनतून पाचोरा रस्त्यावरील जैन व्हॅलीत जात होते.
मोठा आवाज झाल्याने नागरिक धावले
महामार्गावरुन जात असताना आहुजानगरजवळ अचानक ट्रॅक्टरचे समोरच टायर फुटले. यात चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर महामार्गालगत साईडपट्टीच्या खाली उतरुन 15 फूट खोल खड्डयात उलटले. या ट्रॅक्टरवरुन फेकल्या गेल्या मजूर खाली पडले. मोठ्याने आवाज झाल्याने रस्त्यावरुन ये-जा करणार्या वाहनधारकांसह परिसरातील दुकानदार तसेच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
चालकासह 7 मजूर जखमी
या अपघातात चालक देविदास देवराम जवरे (वय 58, रा.शिवाजीनगर) , रामकृष्ण बुधा तांदळे (वय 35, रा.दापोरा), दगडु सुपडू कदम (वय 40, रा.दापोरा) , दिपक मुरलीधर वराडे (वय 28, रा.शिरसोली) , सुदर्शन शेषराव लहाणे (वय 40, रा.जळगाव) , संतोष रामदास मराठे (वय 45 रा.शिरसोली) , नितीन श्रीधर सुरवाडे (वय 28 रा. दापोरा हे जखमी झाले. चालक देविदास जवरे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अन्य दोघांच्या डोक्यास मार लागल्याने रक्तस्त्राव होवून दुखापत झाली आहे. नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर जैन कंपनीच्या अधिकार्यांसह जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. पुढील उपचारासाठी जखमींना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
बस नादुरुस्त झाल्याने वाहतुकीचा खोळंबा
दुचाकी, रिक्षा व अन्य वाहने मिळेल त्या जागेत तशीच उभे करुन नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केली. या बघ्यांच्या वाहनांमुळे वाहतूक ठप्प झाली. यातच महामार्गावरुन जात असलेली एक बस नादुरूस्त झाल्याने त्यात भर पडली. त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी तालुका पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरु होते.