पुणे : पुण्यातील टिंबर मार्केट परिसरात मंगळवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीमध्ये 30 हून अधिक घरे आणि दुकानांची राखरांगोळी झाली आहे. या आगीत गोडाऊन, दुकाने आणि घरे अक्षरशः भस्मसात झाली. अग्निशामक दलाने अथक प्रयत्नानंतर अगीवर नियत्रंण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. फॅक्टरीमध्ये एक सिलेंडर फुटल्यानंतर एकूण चार सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजामुळे नागरिक घराबाहेर आले, यामुळे मोठी जीवितहानी टळली. घटनेला जबाबदार फॅक्टरी नेमकी कोणाची आहे, हे अद्याप समजलेले नाही.
भवानी पेठ टिम्बर मार्केट परिसरात विजय वल्लभ शाळेमागे मोकळ्या जागेवर पत्र्यांचे शेड करून दुकाने आणि घरे बनविली आहेत. तसेच येथे काही छोट्या फॅक्टरी आणि काही पक्की दुमजली घरेही आहेत. दुमजली इमारतींमध्ये खाली दुकाने व फॅक्टरी असून वरच्या मजल्यावर नागरिक राहतात. मध्यभागात एक केळी व बटाट्याचे वेफर्स बनविणारी फॅक्टरी आहे. या फॅक्टरीतील कामगार येथेच राहतात. मध्यरात्री फॅक्टरीत काम सुरु होते. मोठ्या मशनरी तसेच वेफर्स बनवण्यासाठी भट्टी आहे. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागताच, कामगारांनी बाहेर पळ काढला. मात्र, काही वेळातच एका सिंलेडरचा स्फोट झाला आणि आग मोठ्या प्रमाणात भडकली. एका सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर काही वेळातच एका पाठोपाठ तीन सिलेंडरचा स्फोट झाला व आगीने रौद्ररूप धारण केले. शेजारीच असणारे टायर्सचे गोडाऊन व लाकडी फॅक्टरीलाही आग लागली. अगदी थोड्याच वेळात आग
आसपासच्या घरांमध्ये देखील घुसली
अकरा फायर फायटर गाड्या, चार पाण्याचे टँकर आणि जवानांनी एक तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणल्याची माहिती मध्यवर्ती केंद्राचे प्रमुख प्रकाश गोरे यांनी दिली. आगीत 25 ते 30 घरांमधील एलईडी, फ्रिज, कपाट तसेच इतर सामानाची राखरांगोळी झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे.
गाड्यांना रस्ता नाही
येथे इमारती आणि शेड्सची इतकी गर्दी झाली आहे की दुचाकी किंवा पायी जाण्याइतपतच रस्ता उरला आहे. अग्निशमन विभागाच्या गाड्यांना देखील आत जाता न आल्याने रस्त्यावरच गाड्या उभ्या कराव्या लागल्या. आगीच्या घटनेमुळे स्थानिक नागरिक खूप संतप्त झाले असून त्यांनी गोंधळ घातल्याचेही सांगण्यात येत आहे.
त्या तरुणीमुळे वाचले जिव
फॅक्टरीच्या समोरच एक तरुणी तिच्या कुटूंबासह राहते. आग लागल्यानंतर पहिल्यांदा मोठा आवाज आला त्यामुळे ती जागी झाली आणि बाहेर आली. तोपर्यंत आग वेगाने पसरत होती. या तरुणीने तत्परता दाखवत शेजारी राहणार्या लोकांना उठविले आणि मुलांना घराबाहेर काढण्यास सांगितले. यानंतर लहान-लहान मुलांना घेऊन नागरिकांनी घर सोडून रस्त्यावर पळ काढला. तोपर्यंत आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. त्याचवेळी फॅक्टरीत असणार्या सिलेंडरचा स्फोट होण्यास सुरुवात झाल्याचे रुखसाना शेख या तरुणीने सांगितले. तिच्या या धाडसामुळे आणि सतर्कतेमुळे दुर्दैवी घटना घडली नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.
घटनेला जबाबदार फॅक्टरी कोणाची
या घटनेची सुरुवात झालेली वेफर्सची फॅक्टरी कोणाची आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. विशेष म्हणजे, येथे राहणार्या रहिवाशांनाही कामगारांव्यतिरीक्त काहीच माहित नाही. तर, फॅक्टरीत दहा ते बारा वर्षांच्या मुलांकडून काम करुन घेतले जात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. पहाटे तीन वाजता फॅक्टरीत वेफर्स बनवण्याचे काम सुरु केले जात होते. दिवसाला तब्बल 700 ते 800 किलो वेफर्स येथे बनवले जात होते. फॅक्टरी बेकायदेशीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आग लागताच कामगार पसार झाले असून, सायंकाळपर्यंत त्यांचा थांगपत्ताही पोलिसांना लागला नव्हता. त्यांचे मोबाईलही बंद आहेत. त्यामुळे ही फॅक्टरी नेमकी कोणाची आहे, असा प्रश्न आता समोर आला आहे.
पाच हजारात कोणालाही जागा
या भागात पाच हजार रूपये दिल्यानंतर पत्र्याचे शेड मारुन राहण्यास दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील रहिवाशांमध्ये ही चर्चा ऐकायला मिळाली आहे. याठिकाणी गोडाऊनही आहेत. मात्र, हे सर्व लोक बाहेरचे आहेत. तर, याठिकाणी व्यवसाय करणार्यांची नावेही माहीत नाहीत.
भंगारवाल्यांची चांदी
लोखंडी गजाच्या सहाय्याने पत्र्यांचे शेड मारण्यात आले आहेत. आगीच्या घटनेनंतर येथील दुकानदारांनी राहिलेले चांगले साहित्य काढून नेण्याची घाई केली. तर, खराब झालेले पत्रे तसेच लोखंड बाहेर टाकण्यात येत होते. अनेकांनी जागेवरच भंगार व्यावसायिकांना बोलवून विक्री सुरु केली होती. आगीत स्थानिकांचे नुकसान झाले असले तरी भंगारवाल्यांची मात्र चांदी झाली.