कडव्या हिंदुत्ववादी संघटनांनी टिपू सुलतानला व्हिलन ठरवले आहे. त्यांच्या मते लाखो हिंदूंची क्रूरपणे हत्या करणारा आणि हजारो स्त्रियांवर बलात्कार करणारा क्रूरकर्मा टीपू सुलतान हा इंग्रजांशी लढणारा स्वातंत्र्य योद्धा किंवा हुतात्मा नव्हता, तर हिंदू राजांकडून ओरबाडून स्वतःकडे घेतलेले म्हैसूरचे राज्य सोडवण्यासाठी त्याने इंग्रजांशी युद्ध केले होते. तो देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढला नाही. अशा स्थितीत टिपूला हुतात्मा म्हणणे कसे योग्य होईल ? तो हुतात्मा आणि स्वातंत्रसैनिक होता, तर बाबर, औरंगजेब, अफजलखान, गजनीचा महंमद यांच्यासारखे आक्रमक कोण होते? का ते सुद्धा स्वातंत्रसैनिक होते? मुसलमान मतांच्या लाचारीसाठी खोटा आणि कपोलकल्पित इतिहास मांडून क्रूरकर्मा टिपूचे उदात्तीकरण करण्याचे जे कारस्थान कर्नाटकातील काँग्रेस सरकार करत आहे, त्याविषयी राष्ट्रपतींच्या केंद्रातील सल्लागार मंत्रीपरिषदेने यादीत का केले नाही?
खरे तर राष्ट्रपतींचे वक्तव्य हे राष्ट्राचे मत असले पाहिजे. त्यासाठी अधिक जबाबदारीने आणि अभ्यासपूर्ण वक्तव्य करणे, हे राष्ट्रपतींची जबाबदारी आहे. टिपूचा हिंदुद्वेष्टा आणि रक्तरंजित इतिहास कोविंद यांनी कधीही न वाचता त्याला हुतात्मा म्हणणे, हे सर्वथैव अनुचित आहे.वस्तुतः टिपू सुलतानाने दक्षिणेतील सत्ता हाती येताच ‘सर्व काफिरांना (हिंदूंना) मुस्लिम करीन’, अशी प्रतिज्ञा भर सभेत केली. त्याने गावोगावच्या मुस्लिमांना लेखी कळवले, ‘सार्या हिंदू स्त्री-पुरुषांना इस्लामची दीक्षा द्या. स्वेच्छेने धर्मांतर न करणार्या हिंदूंना बलात्काराने मुस्लिम करा किंवा हिंदू पुरुषांना ठार मारा आणि त्यांच्या स्त्रियांना मुस्लिमांमध्ये वाटून टाका.’ पुढे टिपूने मलबार भागातील एक लाख हिंदूंना बाटवले. कर्नाटक स्वारीत त्याने एका दिवसाच्या आत 50 हजार हिंदू बाटवले. त्याने हिंदूंच्या धर्मांतरासाठी काही कडव्या मुस्लिमांची विशेष टोळी उभारली. आक्रमक इस्लामी प्रचार केल्यामुळे त्याला ‘सुलतान’, ‘गाझी’, ‘इस्लामचा कर्मवीर’ इत्यादी उपाध्या देश-विदेशांतील मुसलमान आणि तुर्कस्थानचा खलिफा यांच्याकडून मिळाल्या होत्या. हा सारा क्रौर्यपूर्ण इतिहास राष्ट्रपती महोदयांनी वाचावा, अशी कडव्या हिंदूंकडून मागणी होत आहे.
कडव्या हिंदुत्ववादी संघटनांनी टिपू सुलतानचे उपरोल्लिखीत वर्णन करत टिपू सुलतान हा देखील एक परकीय आक्रमकणकर्ताच होता, असा दावा करत आहे. देशाचा इतिहासकालीन अनेक घटना आहेत. त्याच्यासंबंधी अनेकांची नावे जोडलेली आहेत. मात्र त्या घटनांची सत्यता तपासण्या इतकी प्रभावी दस्तऐवजांची उणीव आपल्याकडे आहे, यामुळे खरेतर इतिहासकालीन व्यक्तीमत्त्वांबद्दल आजच्या काळात अनेक मतभेद निर्माण झाले आहेत. कालपर्यंत ज्या व्यक्तीमत्त्वांचा उद्धार केला जात होता, तेच व्यक्तीमत्त्व विविध इतिहासकालिन दाखले देऊन व्हिलन ठरवले जात आहेत. असा संभ्रम दूर करण्यासाठी आता शासनानेच पुढाकार घ्यावा.
-जयवंत हाबळे
वरिष्ठ उपसंपादक जनशक्ति, मुंबई
8691929797