टिळकनगर रेल्वेस्थानकात होतोय गर्दुल्यांचा वावर

0

मुंबई । टिळकनगर रेल्वेस्थानकाचा परिसर झाडाझुडपांनी व्यापल्याने येथे दिवसभर चरस, दारुडे, गर्दुल्यांचा बिनधास्त वावर होत असल्याने प्रवासी आणि रेल्वे कॉलनीमध्ये राहणार्‍या नागरिकांना जीव मुठीत धरून झुडपातून वाट काढून चालावे लागत आहे. टिळकनगर रेल्वे परिसराच्या हद्दीत आंबेडकर विद्यालय, लोकमान्य टिळक विद्यालय, आदर्श विद्यालय आणि महानगरपालिकेची शाळा असल्याने सकाळ, संध्याकाळ पालक व विद्यार्थी यांचा याच मार्गातून प्रवास होतो. गर्दुल्ले नशा करून महिलांना पाहून स्वतःचे कपडे उतरून लघु शंका करत अश्‍लील चाळे करत असल्याचे स्थानक परिसराच्या साबळे नगरमध्ये राहणार्‍या काही महिलांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सीसीटीव्ही, दिवे बसवण्याची मागणी
परिसरात झाडेझुडपे वाढल्याने रोज गर्दुल्ले येथे नशापान करण्यासाठी येतात. शिवाय महिलांचे मंगळसूत्र लंपास करण्याचे प्रकार देखील वाढले आहे. रेल्वे प्रशासनाने या परिसरातील सर्व वाढलेली झाडीझुडपे कापून येथे सीसीटीव्ही आणि दिवे बसवण्यात यावे, अशी मागणी महिला व विद्यार्थ्यांनी केली आहे.

चोरींच्या वाढत्या घटना
टिळकनगर रेल्वेस्थानकाच्या परिसरात झाडेझुडपे वाढल्याने याचा फायदा गर्दुल्ले नशापान करण्यासाठी करतात. नशा केल्यानंतर हेच गर्दुल्ले कुणी महिला वा विद्यार्थिनी दिसली की त्यांना पाहून अश्‍लील चाळे करतात त्यामुळे महिला व शाळकरी मुलींचा जीव धोक्यात आहे. या गर्दुल्यांवर कारवाई झाली नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते. गर्दुल्ले मंगळसूत्र लंपास करत असल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. आरपीएफ पोलिसांना आम्ही नेहमी तक्रार करतो मात्र तेवढ्या पुरते गर्दुल्ले हटतात अन दुसर्‍या दिवशी पुन्हा गर्दुल्ले येथे वावर करतात. या ठिकाणची झाडीझुडपे कापून परिसर चालण्यासाठी मोकळा करावा आणि दिवाबत्ती व सीसी टीव्ही बसवावे.