पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खापर पणतू आणि काँग्रेसनेते रोहित टिळक यांच्या अटकपूर्व जामिनास विरोध करणार्या 41 वर्षीय पीडितेच्या अर्जावर आजदेखील अंतिम निर्णय होऊ शकला नाही. गुरुवारी (दि.10) आपण अंतिम निर्णय देऊ, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश लता येणकर यांच्या कोर्टाने सांगितले, असे पीडितेचे वकील तौसिफ शेख यांनी सांगितले. दरम्यान, टिळक यांची अटक टाळण्यासाठी राजकीय दबाव येत आहे, असा आरोप पीडितेने आपल्या ट्वीटर अकाउंटद्वारे पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर तक्रार नोंदवून केला आहे. पीडितेच्या अर्जावर मंगळवारी येणकर कोर्टात सुनावणी झाली. यावेळी अॅड. तौसिफ शेख यांनी आरोपीची पत्नी ही तपास अधिकार्यांना भेटून, आरोपीचा बचाव करते. तसेच, तिने पीडितेचे छायाचित्र व नाव व्हायरल केले आहे. तेव्हा तिलाही या प्रकरणात आरोपी करण्यात यावे, अशी मागणीही पीडितेच्यावतीने करण्यात आली. शिवाय, आरोपीने न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी स्वतंत्र अर्जाद्वारे मागणीही पीडितेच्यावतीने करण्यात आल्याचे अॅड. शेख म्हणाले.
राजकीय दबावाने अटक टाळली जात आहे?
पीडितेचा अर्ज प्रधान व जिल्हा न्यायाधीशांनी फेटाळल्यानंतर पीडितेच्यावतीने ट्वीट करून, याप्रकरणात राजकीय दबाव आणून आरोपी रोहित टिळक यांची अटक टाळली जात असल्याचे नमूद केले. अटक टळत असल्याने वैद्यकीय पुुरावे नष्ट केले जात आहेत, असेही या ट्वीटमध्ये नमूद आहे. याबाबतची तक्रारही पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे ट्वीटरद्वारे करण्यात आलेली आहे. दरम्यान, मंगळवारी रोहित टिळक यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जासह इतर दोन अर्जावरही सुनावणी झाली. त्यावर दोन्ही पक्षांचे म्हणणे अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी ऐकूण घेतले. आरोपीने कोर्टात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याबद्दल पीडितेच्यावतीने आणखी एक अर्ज दाखल करण्यात आला. या सर्व अर्जावर आपण गुरुवारी (दि.10) अंतिम निकाल देऊ, असे न्यायाधीशांनी सांगितले. त्यामुळे आता टिळक यांचा अटकपूर्व जामीनअर्ज रद्द होऊन त्यांना अटक होते, की न्यायाधीश ही तक्रार निकाली काढतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागलेले आहे.
बचाव अन् प्रतिज्ञापत्रातील वक्तव्यात तफावत!
पीडितेच्यावतीने मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांकडे नवीन अर्ज दाखल करण्यात आला. त्यात आरोपीने खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. टिळक यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते, की त्यांनी पीडितेसोबत कोणतेही शारीरिक संबंध निर्माण केलेले नाहीत. तर पीडितेनेच त्यांना तसे करण्यासाठी उद्युक्त केले होते. तथापि, 31 जुलैच्या बचावादरम्यान टिळक यांचे वकील यांनी मात्र सांगितले होते, की पीडिता व आरोपी यांच्यामध्ये परस्पर सहमतीने शरीरसंबंध आले होते. याबाबतचे वक्तव्य वृत्तपत्रांमध्येही आलेले आहे. तसे, प्रतिज्ञापत्रही आरोपीच्यावतीने सादर करण्यात आलेले आहे. त्यामुळे बचावपक्ष न्यायालयासमोर खोटे बोलत असल्याने, खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले म्हणून आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात यावी. तसेच, आरोपीचा अटकपूर्व जामीन तातडीने रद्द करण्यात यावा. आता या नव्या अर्जावरदेखील अतिरिक्त सत्र न्यायाधीश गुरुवारीच आपला अंतिम निर्णय देणार आहे.