‘टीईटी’ अनुत्तीर्ण शिक्षकांचे वेतन सुरू राहणार

0

प्राथमिक शिक्षण सहसंचालकांच्या सूचना

पुणे : राज्यातील विविध शाळांमधील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांच्या वेतन रोखण्याचा मुद्दा आदेशातून वगळण्याच्या सूचना थेट प्राथमिक शिक्षण सहसंचालकांनी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाला दिल्या आहेत. यामुळे या शिक्षकांचे वेतन सुरू राहणार आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या नोकरीसाठी टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन शिक्षकांना घालण्यात आले आहे. 13 फेब्रुवारी 2013 नंतर शाळांमध्ये नोकरीला लागलेल्या शिक्षकांना 30 मार्च 2019 पर्यंत टीईटी’ उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. अन्यथा सेवा संपुष्टात आणण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आलेले आहे.

शिक्षकांनी उठविला आवाज

जालना व परभणी या जिल्ह्यातील वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथकाच्या अधिक्षकांनी टीईटी’ अनुत्तीर्ण शिक्षकांचे वेतन रोखण्याबाबतचे आदेश काढले होते. यानंतर या शिक्षकांनी आवाज उठविला. त्यांनी शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी भेट घेऊन वेतन सुरू ठेवण्याचा आग्रह धरला. त्याबाबतचे निवेदनही त्यांनी दिले आहे. त्याची दखल घेत टेमकर यांनी वेतन बंद करण्याबाबतचा मुद्दा आदेशातून वगळण्याच्या सूचना शिक्षणाधिकार्‍यांना फोनद्वारे दिल्या आहेत. टीईटी’ अनुत्तीर्ण शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. तसेच या शिक्षकांच्या सेवा संपुष्टात आणण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी काही उमेदवारांनीही याचिका दाखल केल्या आहेत. या दोन्ही याचिकांवर अद्याप न्यायालयाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामुळे शिक्षकांचे वेतन सुरू राहणार, हे स्पष्ट होऊ लागले आहे.