जानेवारीऐवजी मार्चमध्ये परीक्षा घ्यावी लागणार; वर्षातून दोन वेळा परीक्षांचे नियोजन
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने अद्याप मान्यताच दिलेली नाही. यामुळे ही परीक्षा आता मार्चपर्यंत लांबणीवर पडण्याचीच शक्यता अधिक आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची नोकरी करण्यासाठी शासनाने उमेदवारांना ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन घातलेले आहे. वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ही परीक्षा वर्षातून एकदाच होऊ लागलेली आहे. यंदाच्या वर्षात 15 जुलैला परीक्षा झाली आहे. दरवर्षी परीक्षा परिषदेकडून ‘टीईटी’ घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला जातो. त्यानंतर मान्यता मिळाल्यानंतर परीक्षा घेण्याबाबतचे नियोजन प्रत्यक्षात करण्यात येत असते.
जानेवारी, 2019मध्ये परीक्षा घेण्यासाठी गेल्या दोन महिन्यापूर्वीच परिषदेकडून शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र शासनाकडून या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आता ही परीक्षा पुढे ढकलण्याचीच जास्त चिन्हे आहेत. जानेवारीऐवजी मार्चमध्ये परीक्षा घ्यावी लागणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधिकार्यांकडून मिळाली आहे.
परीक्षा घेण्यासाठी किमान दोन महिने आधीपासूनच सर्व तयारी सुरू करावी लागते. परीक्षेची रितसर जाहीरात प्रसिद्ध करणे, उमेदवारी अर्ज मागविणे व अर्ज तपासणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेश पत्र वाटप करणे, बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे या सर्व प्रक्रियेसाठी ठराविक कालावधी हा द्याव्याच लागतो. त्यामुळे आता जानेवारीमध्ये परीक्षा घेणे शक्य होणार नसल्याचे अधिकार्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.