टीडीपीच्या अ‍ॅपसाठी ७.८ कोटी नागरिकांचा आधार डेटा चोरला; कंपनीवर गुन्हा दाखल !

0

हैद्राबाद:तेलगु देसम पार्टीसाठी ‘सेवामित्र’ हे अ‍ॅप बनवणाऱ्या आयटी कंपनीविरोधात आधार डेटा चोरीच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातल्या ७.८ कोटींहून अधिक नागरिकांचा डेटा चोरल्याचा आरोप या कंपनीवर आहे. युआयडीएआयच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांची मिळून लोकसंख्या ८.४ कोटी आहे. यापैकी ७.८ कोटी नागरिकांची माहिती या कंपनीने जमा केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आंध्र प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेलुगू देशम पक्षाने ‘सेवामित्र’ हे नवीन अ‍ॅप लॉंच करण्यात आले आहे. या अ‍ॅपचा करार ज्या कंपनीला दिला त्या आयटी ग्रीड्स (इंडिया) कंपनीच्या आयटी सेलने ७ कोटी ८० लाखांहून अधिक लोकांचा डेटा चोरला असल्याची माहिती मिळते आहे. स्टेट डेटा डिपॉझिटरीतून हा डेटा चोरण्यात आला आहे. संबंधित आयटी सेलच्या हार्ड डिस्क तपासल्यानंतर संबंधित अ‍ॅपच्या रिमुव्हेबल स्टोरेजमध्ये हा डेटा ठेवला असल्याचं स्पष्ट झालं. या डेटाचे स्वरूप युआयएडीए सारखेच असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. आधार कायदा २०१६ अंतर्गत याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी टीडीपीने सर्व आरोप फेटाळले आहेत. कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती चोरली नसल्याची माहिती टीडीपीने दिली आहे. आधारचा कोणताच कच्चा डेटा आमच्याकडे नाही आणि जो डेटा आम्ही वापरतो तो कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींची खातरजमा करण्यासाठी वापरतो, असा खुलासा टीडीपीने केला आहे.