जळगाव । पुढच्या वर्गात प्रवेश किंवा शाळा बदलीसाठी आवश्यक दाखला संबंधित विद्यार्थ्याला त्वरित द्यावा, तो रोखणे हा शाळांचा अधिकार नाही, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. यासंबंधीचे पत्र जिल्हा परिषदेस प्राप्त झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांचे टी.सी. अडवून ठेवणार्या शाळांना आता चाप लावण्यात येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी हुशार असल्यास किंवा विद्यार्थी संख्या कमी होवू नये यासाठी अनेक शाळा विद्यार्थी, पालकांची अडवणूक करून त्यांना टीसी (स्थलांतर प्रमाणपत्र) देत नाहीत. यामुळे विद्यार्थी पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
हुशार विद्यार्थ्यांची पटसंख्या रोखण्यासाठी निर्णय
यासंबंधीच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे येत होत्या. यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व प्राथमिक शाळांना 28 ऑगस्ट 2015 च्या शासन निर्णयानुसार इयत्ता पाचवी आठवी वर्ग जोडण्याचे निकष सुधारित करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद, मनपा नगरपालिका सर्व प्राथमिक शाळांना पाचवी आठवीचे वर्ग जोडण्याबाबतची कार्यवाही शैक्षणिक वर्षात करण्यात येते. वर्ग वाढीच्या या कार्यवाहीपूर्वी इयत्ता चौथी, सातवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यास शाळा व्यवस्थापन टाळाटाळ करतात. यासंबंधीच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला हवा असेल, तर तो त्याला त्वरित द्यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र अद्याप इतर सरकारी कर्मचारी व अधिकारी यांचा पाल्या हुशार असल्यास त्यांच्या बाबतीत असा विचार केला जाणार आहे की नाही असा सवाल उपस्थित होत अहे.