नंदूरबार – शिक्षक पात्रता ( टीईटी) परीक्षेचा निकाल बनावट वेबसाइट तयार करून जाहीर केला जात होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर येऊ लागली आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या राज्यभरातील एजंटांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान या टीईटी घोटाळ्यात आतापर्यंत 900 बोगस शिक्षक निष्पन्न होत असल्याचा दावा करण्यात आला असून चौकशीनंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अशा बोगस शिक्षकांची देखील चौकशी केली जाणार असल्यामुळे खळबळ उडाली आहे. शिक्षक पात्रता ( टीईटी ) परीक्षा घोटाळ्याचे जाळे राज्यात पसरले असल्याने त्यादृष्टीने पुणे येथील पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. नंदुरबार हा जिल्हा देखील या घोटाळ्याचे केंद्रबिंदू ठरला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारांकडून लाखो रुपये घेत टीईटी परीक्षा पास करून देणाऱ्या एजंटांची मोठी साखळी या ठिकाणी देखील कार्यरत होती असा त्याचा कयास लावला जात आहे.
या जिल्ह्यात शिक्षणाधिकारी म्हणून राहिलेले बहुचर्चित सुखदेव ढेरे यांना देखील पोलिसांनी अटक केल्यामुळे त्यांच्या एजंटांच्या यादीत कोण कोण महाभाग आहेत, याचा शोध लवकरच घेतला जाणार आहे. त्यामुळे बोगस शिक्षक बनवण्यासाठी हातभार लावणाऱ्या जिल्ह्यातील एजंटांना कडाक्याच्या थंडीतही घाम फुटू लागला असावा. प्राथमिक व माध्यमिक विभागात नोकरीला असलेले काही शिक्षक शाळा न करता जिल्हा परिषदांमध्ये घिरट्या घालत होते. ते देखील एजंट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा एजंटांसाज जाळे नवापूर पासून ते धडगाव सारख्या दुर्गम भागाच्या कोपऱ्यापर्यंत पसरले असावे. त्यात मुख्य एजंट, एजंटचा मित्र, मित्राचा मित्र अशी साखळी या कामात कार्यरत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच प्रकारच्या एजंटांची चौकशी सुरू झाली आहे . बनावट वेबसाइट तयार करून अपात्र उमेदवारांचे निकाल जाहीर केला जात होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. आतापर्यंत नऊशे बोगस शिक्षक निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला असून हा आकडा मोठा वाढण्याची शक्यता आहे .अशा शिक्षकांनी स्वतःहून समोर येऊन माहिती द्यावी अन्यथा पोलिस तपासात उघड झाले तर बोगस शिक्षक देखील गोत्यात येणार हे मात्र नक्की…