टी-20 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा ऑस्ट्रेलियात

0

दुबई । पुढील टी-20 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेचा यजमान देश आणि सामन्यांच्या ठिकाणांची घोषणा आयसीसीने केली आहे. 2020 साली ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. महिला टी-20 विश्‍वचषक स्पर्धा 21 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत होईल तर पुरुषांची टी 20 विश्‍वचषक स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत चालेल. ऍडलेड, ब्रिसबेन, कॅनबेरा, जिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या आठ शहरांमध्ये टी-20 विश्‍वचषक स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार आहेत. 2020 साली होणार्‍या या विश्‍वचषक स्पर्धेमध्ये 10 महिला संघ आणि पुरुषांचे 16 संघ सहभागी होतील. महिला आणि पुरुषांच्या विजेत्या संघाना समान रक्कम देण्यात येणार आहे.

महिला आणि पुरुषांच्या विश्‍वचषक स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियातील सगळ्यात मोठे स्टेडियम मेलबर्नमध्ये खेळवण्यात येईल.
महिलांचा अंतिम सामना 8 मार्च 2020 म्हणजे महिला दिनाच्या दिवशी होणार आहे. टी-20 विश्‍वचषक स्पर्धेच्या घोषणेवेळी ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि महिला संघाची कर्णधार मेग लेनिन उपस्थित होती. आयसीसीनं या दोघांचे फोटो आणि सामने खेळवण्यात येणार्‍या शहरांची नावे ट्विट केली आहेत. मागील टी-20 विश्‍वचषक स्पर्धा 2016 साली भारतात झाली होती. या विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडला 4 विकेट्सने हरवले होते. तर उपांत्य फेरीतभारताचा वेस्ट इंडिजकडून पराभव झाला होता. हा सामना भारत 7 विकेट्सने गमावला होता.