पिंपरी-चिंचवड : एमआयडीसी क्षेत्रामधील टी-201 पुनर्वसन प्रकल्प गाळ्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा भाडेदर निश्चित करावा. तसेच ते गाळे संबंधितांना त्वरित हस्तांतरित करण्यात यावेत. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल, असे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. लघु उद्योजक संघटनेच्या विविध मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
संघटनेच्या विविध मागण्या
टी-201 पुनर्वसन प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यात येऊन संबंधितांना महापालिकेने व्यवसायासाठी गाळे हस्तांतरित करावेत. तळवडे, कुदळवाडी, चिखली एमआयडीसी येथे मूलभूत सुविधा द्याव्यात, मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्स पी.सी.एम.सी. यांची संयुक्त बैठक घेऊन संघटनेचे प्रश्न मार्गी लावावेत, एफ-2 ब्लॉक येथे अग्निशामक केंद्र उभारण्यात यावे, एमआयडीसीमध्ये पीएमपीएमएल बसची सोय करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी लघु उद्योजक संघटनेच्या पदाधिकार्यांनी केल्या. लघु उद्योजक संघटनेच्या पदाधिकार्यांनी मांडलेल्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले.