टेंभा ग्रामपंचायतीच्या नागरी सुविधांसाठी प्रशासनाला साकडे!

0

शहापूर । मुंबईसारख्या महानगराला ज्या मोडकसागर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. ते धरण टेंभा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे. मात्र तेथील गाव-पाड्यांची सध्याची अवस्था धरण उशाला व कोरड घशाला अशी अवस्था झाल्यामुळे टेभा ग्रामपंचायतीला मुंबई महानगरपालिकेने नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी उपसरपंच एकनाथ कोर व ग्रामस्थांनी मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती रमेश कोरगावकर यांची भेट घेऊन केली आहे. या परिसरातील व्यथांचे निवेदन त्यांना देऊन विविध प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा केली.

टँकरमुक्त करण्याची मागणी
याबाबत दिलेल्या निवेदनानुसार मुंबई आणि अनेक उपनगरांची तहान शहापूर तालुक्यातील टेंभा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील मुंबई महापालिकेच्या मोडकसागर ह्या धरणातून भागवली जाते. मात्र टेंभा ग्रामपंचायतीच्या परिसरातील गाव पाड्यामध्ये अनेक सुविधांची वंचित आहेत. यामध्ये वैतरणा(मोडकसागर) येथील 15 कि.मी रस्त्याची झालेली दुरावस्था, जीर्ण झालेले भोसपाडा व आंबिवली येथे पूल, यांची तातडीने दूरुस्ती करून सदर संपूर्ण रस्ता नव्याने बनविण्यात यावा. तसेच टेभा ग्रामपंचायतीच्या परिसरातील गाव-पाड्यांना मूलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात. तसेच येथील गाव-पाड्यांना धरणाजवळ असूनही वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याबाबत योग्य उपायोजना करून टेभा ग्रामपंचायतीला तरी टँकरमुक्त करावे अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

मागण्या पूर्ण करण्याचे ग्वाही
अप्पर वैतरणा व तानसा परिसरातील गाव-पाड्यांना रस्ते, गटार, पाणीपुरवठा, शौचालय, आदी नागरी सुविधा पुरविल्या जात असून त्याच धर्तीवर टेंभा परिसरातील गावपाड्यांचा विकास व्हावा असे ग्रामस्थांनी सभापती कोरगावकर यांना सांगितले. तर तातडीने या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले आहे. यावेळी चर्चेदरम्यान उपसरपंच एकनाथ कोर, पत्रकार अनिल घोडविंदे, शिवसेना शहापूर तालुका प्रमुख मारुती धिर्डे, वसंत हारोठे, युसूफ पठाण, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.