टेनिस स्पर्धेसाठी करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी कशाला?

0

पिंपरी-चिंचवड : बालेवाडी येथील क्रीडा संकुलात होणार्‍या ’महाराष्ट्र ओपन’ टेनिस स्पर्धेचा पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडूंना किती फायदा होणार आहे. टेनिस खेळ श्रीमंताचा असून गरिबांचा नाही. टेनिस स्पर्धा आयोजन करणारी संस्था नामांकित आहे. तर, तिला पालिकेने का पैसे द्यायचे ? राज्य सरकार स्पर्धेचे आयोजन करणार आहे, तर त्याचा भार पालिकेने का पेलावा? टेनिस स्पर्धेसाठी पैसे देऊन करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करु नये, अशी मागणी करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पैसे देण्यास विरोध दर्शविला. तसेच त्यावर मतदान घेण्याची मागणी केली. प्रस्तावाच्या बाजूने 45 तर विरोधात 18 मते पडली. 27 मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. राष्ट्रवादी, शिवसेने विरोधात मतदान केले. तर, मनसे आणि अपक्ष नगरसेवकांनी तटस्थ राहणे पसंत केले.

स्पर्धेला पाच कोटी देण्याचा विषय
सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर बालेवाडी येथील क्रीडा संकुलात होणा-या ’महाराष्ट्र ओपन’ टेनिस स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढील पाच वर्षासाठी प्रतिवर्षी एक कोटी रुपये प्रमाणे पाच कोटी रुपये देण्याचा विषय होता. त्याला राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला. असोसिएशन ऑफ टेनिस प्लेअर्स (एटीपी) ही जगातील प्रसिद्ध प्रोफेशनल टेनिस संघटना आहे. या संघटनेमार्फत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या आयोजन, बक्षिसांची रक्कम मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी द्यायची आहे. तर, उर्वरित निधी प्रशासकीय संस्थाकडून घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे देखील नाव आहे. या स्पर्धा पाच वर्षांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धेला 16 कोटी रुपये खर्च येणार आहे.

पालिकेकडे जादा पैसे झालेत?
विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, टेनिस खेळ श्रीमंताचा आहे. त्यामुळे त्याचा फायदा शहरातील नागरिकांना होणार नाही. त्यामुळे या स्पर्धेस पैसे देऊन करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करु नये माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या, टेनिस स्पर्धेस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. तर, त्याचा खर्च पालिकेने का करावा ? टेनिस स्पर्धेवर करदात्या पैशांची उधळपट्टी करु नये. पालिकेने पाच कोटी रुपयांचा बोजा कशाकरिता उचलावा? पालिकेकडे पैसे जास्त झाले आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

संस्था चेन्नईची, स्पर्धा बालेवाडी, महापालिकेचा संबध काय?
दत्ता साने म्हणाले, स्पर्धा घेणारी संस्था चेन्नईची असून स्पर्धा बालेवाडीत होणार आहे. त्याचा शहरातील किती खेळाडूंना फायदा होईल. शहराचा काय लौंकिक होणार आहे. त्यामुळे उगच करदात्यांच्या पैशाचे का नुकसान करता? नगरसेवक जावेद शेख म्हणाले, स्पर्धेचे आयोजन करणारी संस्था मोठी असताना त्यांना पालिकेने का ’स्पॉन्सर’ करायचे ?

राज्य शासनाकडून प्रस्ताव : एकनाथ पवार
संदीप कस्पटे म्हणाले, स्पर्धा चांगली आहे. त्याचा शहरातील खेळाडूंना फायदा होईल. सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले. बालेवाडी स्टेडियममध्ये या स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे बालेवाडी पिंपरी-चिंचवड शहरातच आहे. या स्पर्धेसाठी मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी निधी द्यायचा आहे. तर, उर्वरित निधी प्रशासकीय संस्थाकडून घेण्यात येणार आहे. केवळ भाजपच्या राज्य सरकारने प्रस्ताव दिला आहे, म्हणून विरोध करायचा अशी भूमिका नसली पाहिजे.