टेम्पो व आयशरच्या भीषण अपघातात 4 जण ठार

0

शहादा । तालुक्यातील म्हसावद-आमोदा जवळ 28 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास टेम्पो व आयशरच्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार तर 5 जण जखमी झाल्याची घटना घडली. तालुक्यातील तलवाडी व लक्कडकोट येथील आदिवासी समाज बांधव एका कार्यक्रमासाठी तालुक्यातील घोंगरेगाव येथे गेले होते. शहादा-धाडगाव रोडवर असलेल्या विटभट्टीजवळ रिक्षा क्र.(एमएच 39 डी 895) ने परतत येत असतांना समोरून येणार्‍या भरधाव 407 टेम्पो क्र.(एमएच 18 ए 7473) वरील चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षात बसलेले रोहिदास कमा पावारा (55), गोरख इंदा पावरा (40), गुलाब फकीम पावरा (55) तीनही रा. तलवाडी ता.शहादा, सोंगा रायमल पावरा (35) रा.लक्कडकोट ता.शहादा यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर पाच जखमी झाले आहे. त्यातील तीन जण गंभीर अवस्थेत असून दोन जण किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर 407 वरील चालक फरार झाला असून भाईदास सिंगा पावरा (52) तलवाडी ता.शहादा जि. नंदूरबार यांच्या फिर्यादीवरून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मयत शवविच्छेदन करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.