टेलिकॉम क्षेत्रात अमर्याद संधी

0

भुसावळ । पृथ्वीवरील माणसाव्यतिरिक्त सौरमालेत ज्या ठिकाणी मानवी जीवनाची शक्यता आहे त्या त्या ग्रहाशी किंवा तेथील जीव सृष्टि संवादाचे प्रयत्न शास्रज्ञ करीत आहेत, त्यात सुद्धा टेलिकॉम क्षेत्राचा प्रचंड मोठा सहभाग आहे. येणारे शतक हे टेलिकॉम सेंचुरी म्हणून ओळखल जाईल. अमर्याद संधी आणि अमर्याद ज्ञान असलेल्या या क्षेत्रात उतरुन विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे असे आवाहन प्राचार्य डॉ.आर.पी. सिंह यांनी केले. संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्यूनिकेशन विभागाच्या वतीने जागतिक टेलिकॉम दिवसानिमित्त 17 मे 2017 रोजी टेलिकॉम क्षेत्रातील संशोधन व सुवर्णसंधी या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र आयोजित केलेले होते. महाविद्यालयातील 20 प्राध्यपकांनी या चर्चा सत्रात सहभाग घेतला. संशोधन व संधी यावर प्राध्यपकांनी विचार मांडले. डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली.

भारतात गुंतवणुकीसाठी विदेशी कंपन्या आतूर
टेलिकॉम तंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे सर्वांच्या मोबाईल्समध्ये आलेल्या सुविधांमुळे टेलिकॉम क्षेत्रात काम करण्यासाठी अमाप संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे मत प्रा.नीता नेमाडे यांनी व्यक्त केले. टेलिकॉम क्षेत्राचा भारतातील चलन वाढीमध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. अनेक विदेशी कंपन्या भारतात पैसा गुंतवण्यासाठी आतुर आहेत, याचे कारण म्हणजे भारतात उपलब्ध असलेली प्रचंड प्रमाणातील मागणी हे आहे असे मत प्रा. सुलभा शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

40 लाख रोजगाराच्या संधी
नाशिक केंद्र सरकारच्या नवी दिल्लीस्थित ’एनएसडीसी’ अंतर्गत कार्यरत असलेल्या 23 सेक्टर स्किल कौन्सिल्सपैकी असलेली एक संस्था ’टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिल’नुसार भारतात टेलिकॉम क्षेत्रात या वर्षी सुमारे 10 लाख तर सन 2020 पर्यंत सुमारे 40 लाख रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. असे प्रा. स्मिता चौधरी यांनी सांगितले. टेलिकॉम सेक्टर कौन्सिलच्या निर्देशनानुसार, आज टेलिकॉम क्षेत्रातील एकूण 20 मुख्य शाखांपैकी 4 उपशाखांमध्ये 26 प्रकारचे अत्यंत तातडीने गरज असलेले मनुष्यबळ हवे आहे. कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, फील्ड मेंटेनन्स इंजिनीअर, नेटवर्क मॅनेजमेंट इंजिनीअर, ट्रान्समिशन इंजिनीअर, टेलिकॉम मेनेजर असे विविध प्रकारचे मनुष्यबळ हवे आहे. अशी माहिती प्रा.अनंत भिडे यांनी दिली.

विविध क्षेत्रांना नवी दिशा
जे तंत्रज्ञान अमेरिकेने नाकारले ते भारतीय शास्त्रज्ञांनी अवघ्या दहा पंधरा वर्षात विकसित केले. टेलिकॉमच्या मदतीने अवकाश क्षेत्रातल्या या भारताच्या भरारीमुळे संरक्षण, वाहतूक, हवामान, आणि कृषी, व्यापार, नैसर्गिक आपत्ती अशा विविध क्षेत्रांना नवी दिशा मिळाली. टेलिकॉम क्षेत्रामुळे संरक्षण खातेही अधिक कार्यक्षम झाले असे विचार प्रा. धिरज पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.निलेश निर्मल, नितिन पांगळे, विजय विसपुते, रोहित निर्मल, शत्रुसुधन मिश्रा यांनी परिश्रम घेतले.