नंदुरबार। समन्वय समितीच्या पुढाकाराने कोळी समाजातील विवाह समारंभात अनिष्ठ प्रथांना फाटा देत आदर्श विवाह होवू लागले आहेत. आहेर देणे व घेणे बंध करणे तसेच जेवणाच्या पंगतीत नारळ लावणे, खोबरे वाटी लावणे बंद करणे अशा अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याला वाघाडी तालुका शिरपूर येथील वर पिता सोमनाथ बोरसे वप्रतापूर तालुका तळोदा येथील वधु पिता बाबुलाल शिंदे यांनी प्रतिसाद दिला आहे.
आदिवासी टोकरे कोळी समन्वय समितीने एक आदर्श विवाह घडवून आणला आहे. डॉ.यशकुमार व तेजस्विनी या नव वधू-वरांचा विवाह जमवून या दोन्ही परिवारातील सदस्यांनी अगदी साधेपणाने विवाह केला. तसेच वधू वरांच्या लग्नासाठी कपडे ( बस्ता ) साध्या पध्दतीने केले. वधू पक्षाचे दोन व्यक्ती व वर पक्षाचे दोन व्यक्ती मिळून बस्ता केला.या नव वधूवरांचा विवाह शहादा येथे संपन्न झाला. या विवाह समारंभात समन्वय समितीचे शानाभाऊ सोनवणे व नाना उत्तम बोरसे यांनी वर व वधूला वृक्ष देऊन सत्कार केला. नंतर वर – वधू पित्याचे आभार मानले. वधू -वरांनी एक लग्न दोन झाडे लावून समाजातील अजून एक नवीन आदर्श दिला.