खटला हरल्याच्या रागातून
हिंजवडी : न्यायालयाने बांधकाम व्यावसायिकाच्या बाजूने निकाल दिल्याचा राग मनात धरून आठ जणांच्या टोळक्याने जमीन खरेदी-विक्री व प्लॉटिंग करणार्या व्यावसायिकाच्या कार्यालयात तोडफोड केली. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हिंजवडी फेज दोन येथे घडला. नंदिनी कोंढाळकर (वय 48, रा. हिंजवडी फेज दोन) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढाळकर यांचे साईरंग डेव्हलपर्स प्रा. लि. जमीन खरेदी-विक्री तसेच प्लॉटिंग करून विक्री करण्याचे कार्यालय हिंजवडी फेज दोन येथे आहे. कोंढाळकर या कार्यालयात संचालक पदावर कार्यरत आहेत. 2007 साली माण गावातील गट नंबर 391 मधील जमीन कायदेशीररित्या खरेदीखत करून विकत घेतली.
या व्यवहाराविरुद्ध संबंधित इसमांनी न्यायालयात दावा दाखल केला. या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने कोंढाळकर यांच्या बाजूने दिला. याचा राग मनात धरून संबंधित इसमांनी अज्ञात लोकांच्या मदतीने लाकडी दांडके, कोयते घेऊन कोंढाळकर यांच्या कार्यालयात तोडफोड केली. कार्यालयासमोर लावलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. कार्यालयातील सुरक्षारक्षकाला मारहाण केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक निता धुमाळ तपास करीत आहेत.