महाड । सुमारे चार वर्षांपूर्वी बांधलेल्या महाड तालुक्यातील टोळ गावातील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे अद्यापही उद्घाटन झालेले नाही. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे या इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या दुरवस्थे बरोबरच येथील आरोग्य सेवाही वार्यावर आहे. खाडीपट्ट्यातील टोळ गावात परिसरातील नागरिंकासाठी आरोग्य उपकेंद्राची इमारत राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानातून बांधली आहे. या नंतर पुन्हा जिल्हा परीषदेने जवळपास आठ लाख रूपये संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ता, आणि आतील परीसरावर खर्च केला आहे. चार वर्षापूर्वी झालेल्या या इमारतीचे काम निकृष्ट झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. इमारतीचे उद्घाटन झालेले नाही. त्यामुळे इमारतीही धूळ खात पडून आहे. दासगाव आरोग्य केंद्राच्या अंतर्गत चालणारे टोळ गावातील आरोग्य उपकेंद्र कायम बंद अवस्थेत असते. इमारत बांधल्यापासून आरोग्य सेवेचा लाभ इथल्या नागरीकांना घेता आलेला नाही. असे असले तरी याठिकाणी बांधण्यात आलेली इमारत आणि संरक्षक भिंत, अंतर्गत परिसरावर मात्र लाखो रुपये वाया गेले आहेत.
जिल्हा परिषदेचा लाखो रुपयांचा निधी गेला वाया
या इमारतीच्या भिंतींना तडे गेले आहेत. इमारतीच्या ड्रेनेजचे पाइपदेखील फुटून गेले आहेत. गावाच्या अंतर्गत रस्त्यापासून केवळ काही मीटरचा रस्ता या उपकेंद्राला जोडला आहे. या साठी जिल्हा परिषदेने तब्बल 1 लाख 63 हजार रूपये खर्च केले आहेत. सन 2014 मध्ये रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे. येथील नामफलकावर अंतर्गत रस्ता असा उल्लेख असला तरी संबंधित ठेकेदाराने पेव्हर ब्लॉक टाकून काम केले आहे. या इमारतीला रायगड जिल्हा परीषदेने संरक्षण भिंतीवरदेखील खर्च केला आहे. हे कामदेखील सन 2014 मध्येच झाले असून याकरिता जवळपास 5 लाख रूपये खर्च केले आहेत.