पिंपरी : पापड घेऊन जाणार्या ट्रकला अडवून चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्या खिशातून रोख रक्कम काढून त्याला लुटण्यात आले. ही घटना बुधवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास पिंपरी येथे घडली. सुलतान खान (वय 31, रा. पाशापूरा, ता. बसवकल्याण, जि. बिदर कर्नाटक) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सिद्धार्थ गणेश यादव (वय 22, रा. साई चौक, बलदेव नगर, पिंपरी) आणि करण महापुरे (वय 23, रा. चिखली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलतान खान पुण्याकडून मुंबईच्या दिशेने ट्रकमध्ये पापड घेऊन जात होते. बुधवारी मध्यरात्री पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समोर ग्रेडसेपरेटर मधून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडविले. त्यांना मारहाण केली. त्यांच्या खिशातून जबरदस्तीने एक हजार रुपये घेऊन गेले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.