ट्रकचालकाला लुटले; 35 हजार लंपास

0

देहूरोड । ट्रक रस्त्याच्या बाजुला लावून आराम करण्यासाठी थांबलेल्या ट्रकचालकाला चौघांनी चाकुने जखमी करून लुटल्याची घटना शुक्रवारी मुंबई-पुणे महामार्गावर निगडीजवळ घडली. त्याच्याजवळील 35 हजारांची रोकड आणि मोबाईल त्यांनी लंपास केला. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. राहुल चौधरी (वय 24, रा. उस्मानाबाद) असे जखमी चालकाचे नाव आहे.

रात्री 9.30 च्या सुमारास चौधरी ट्रक घेऊन पुण्याच्या दिशेने जात होता. आराम करण्यासाठी थोडावेळ ट्रक रस्त्याच्या कडेला लावून तो बसला होता. यावेळी चार अनोळखी तरूण ट्रकमध्ये शिरले. गाडी थांबवण्याची वर्गणी देण्याचा आग्रह करू लागले. चौधरी याने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे चौघांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने तरीही विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चौघा लुटारूंपैकी एकाने चौधरी यांच्या हातावर चाकुने वार केला. चोरट्यांनी त्यांच्याकडील मुद्देमाल घेऊन पसार झाले. चौधरी यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्ररणी चार अनोळखी चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयितांबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून लवकरच ते पकडले जातील, असा विश्‍वास पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांनी व्यक्त केला.