धुळे । महामार्गालगत चाळीसगाव रोडवर एका ट्रकच्या कॅबिनमध्ये तरुणाचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळला ही घटना रविवारी सकाळी उजेडात आली. शहरालगत असलेल्या चाळीसगाव रोडवरील चौफुलीजवळ हॉटेल कुणालच्यामागे काशिनाथ ट्रान्सपोर्ट आहे़ या ट्रान्सपोर्टच्या समोरील आवारात ट्रक टँकरची ट्रॉली दुरुस्ती करणार्या प्रविण उर्फ बबलू उचाळे वय 22 रा. गुरुद्वाराच्या मागे, उचाळे वस्ती या युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली असून रविवारी सकाळी ही बाब लक्षात आली.
याबाबत मृताच्या नातेवाईकांनी या युवकाचा घातपात झाल्याचा आरोप केला आहे. चौकशी करुन खुनाचा गुन्हा दाखल करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. घटनाची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे़ युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलेला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर प्राथमिक अहवाल डॉक्टर सादर करतील. त्यानंतरच गळफास घेवून आत्महत्या आहे की खून झाला आहे, हे स्पष्ट होईल़ असे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी सांगितले़ दरम्यान, या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.