ट्रकच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

0
तळेगाव दाभाडे : नो एंट्री तोडून जात असलेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास तळेगाव स्टेशन चौक परिसरात घडली. संजय भीमराव पवार (वय 29, रा. वडगाव मावळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत संजय त्याच्या दुचाकीवरून (एम एच 23 / ए एल 1085) तळेगाव कडून चाकणच्या दिशेने जात होता. त्याने तळेगाव स्टेशन चौकात मल्टी अ‍ॅक्सल ट्रकला (एम एच 06 / बी डी 709) ओव्हरटेक केले. ट्रकच्या पुढे गेल्यानंतर ट्रकची त्याच्या दुचाकीला धडक बसली. ट्रकच्या धडकेत त्याची दुचाकी जागेवर फिरली आणि ट्रकच्या उजव्या चाकाखाली आली. यामध्ये संजय याच्या शरीरावरुन चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. संजय चाकण येथील व्हेरॉक कंपनीमध्ये कायमस्वरूपी कामगार होता. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. तळेगाव स्टेशन चौकात सकाळी आठ ते सायंकाळी सात या वेळेत अवजड वाहनांना बंदी आहे. तरी देखील हा अवजड ट्रक या मार्गावर वाहतूक करत होता. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने डोळेझाक केल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. तसेच संजय याने हेल्मेट घातले नव्हते. हेल्मेट असते तर कदाचित त्याचा प्राण वाचला असता, असेही प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.