ट्रकच्या धडकेत महिला गंभीर जखमी

0

जळगाव । प्रेभात चौक परिसरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळील सिग्नलवर उभ्या असलेल्या महिलेच्या दुचाकीला मागून ट्रकने जोरदार धडक दिली. यात महिलेच्या हाताला व पायाला गंभीर इजा झाली असून उपाचारार्थ खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत. यातच ट्रकचालकाला जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराणा प्रताप पुतळ्याच्या आडोश्याला भाजीपाला विक्रेत्यांनी आपले दुकान थाटले असून चौकात रहदारीस अडथळा होत आहे.

ट्रकने मागून दिली धडक
गणेश कॉलनी परिसरातील जिल्हा परिषद कॉलनी येथील रहिवासी ज्योती राजेश महाजन (वय-38) ह्या त्यांच्या मुलीसोबत महाबळ येथे मोपेड दुचाकी क्रं. एमएच.19.बी.सी.1425 ने काही कामानिमित्त गेले होते. सायंकाळी काम आटोपून पुन्हा महाबळ येथून घरी जाण्यासाठी निघाले. यातच सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास महाराणा प्रताप पुतळ्याजवळील चौकात सिग्नल सुरू असल्याने ज्योती महाजन ह्या थांबल्या. त्या दरम्यान, चालक रविंद्र रमेश पाटील (रा.पाथरी) हा आकाशवाणी चौकाकडून रिंगरोगकडे ट्रक (क्रं. एमएच.19.झेड.2813) घेवून जात होता. तो देखील सिग्नलवर थांबला मात्र अचानक ट्रकवरचा रविंद्र याचा ताबा सुटल्याने ट्रक भरधाव वेगात येवून ज्योती महाजन यांच्या दुचाकीला धडकला. यात त्यांची मुलगी बाजुला फेकली गेली. आणि ज्योती महाजन ह्या ट्रकच्या खाली अडकल्या. या अपघातात त्यांच्या हाता व पायाला लागले तर दुचाकीचे मागच्या बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर लागलीच महाजन यांना जवळच असलेल्या खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघातात त्यांचे प्राण वाचले.

पोलिसांनी चालकास घेतले ताब्यात
बहिणाबाई उद्यानाजवळ अपघात झाल्याची महिती मिळताच जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी अजित पाटील, ललित पाटील, शेखर पाटील यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत ट्रकचालक रविंद्र रमेश पाटील याला ताब्यात घेतले. यानंतर चौकातच उभा असलेला ट्रक व दुचाकी कर्मचार्‍यांनी ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले. तसेच महिलेस खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याने त्या ठिकाणी पोलिस कर्मचार्‍यांनी जावून घटनेची माहिती घेतली. यावेळी महाजन यांच्या नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी केली होती. यातच मुलीला सुखरूप पाहून ज्योती महाजन यांना अश्रु अनावर झाले.

रहदारीस अडथळा
प्रभात चौकातील महाराणा पुतळ्याच्या आडोश्याला गेल्या काही महिन्यांपासून भाजीपाला विक्रेत्यांनी आपली ठांण मांडली असून यामुळे नेहमीच महाराणा प्रताप चौकात रहदारीस अडथळा होत असतो. काही वेळेस मोठ्या वाहनांचा धक्का दुचाकीला लागल्याने वाद उद्भवतात. तर नेहमी या रस्त्यावरून अनेक ट्रक हे शिवाजीनगरकडील रेल्वे मालधक्क्याकडे जातात त्यात या भाजीपाला विके्रत्यांच्या अडथळ्यामुळे चौकात लहान-मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.