ट्रक उलटताच सफरचंद लुटण्यासाठी उड्या

पालजवळील शेरी नाक्याजवळ अपघात : अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प : पोलीस प्रशासनाने घेतली धाव

रावेर : सफरचंदाची वाहतूक करणारा ट्रक तालुक्यातील पालजवळील शेरी नाक्याजवळ उलटल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या अपघातानंतर रस्त्यावर सर्वत्र सफरचंद विखुरल्याने ते वेचण्यासाठी नागरीकांच्या चांगल्याच उड्या पडल्या तर वाहतूक मात्र ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने धाव घेतली. जम्मू येथून मध्य प्रदेशमार्गे शेरी नाका पाल (ता.रावेर) मार्गे महाराष्ट्रात सफरचंद घेवून ट्रक येत असताना कट मारण्याच्या नादात उलटला. अपघातामुळे ट्रकमध्ये सफरचंदाचे बॉक्स बाहेर पडल्याने ते वेचण्यासाठी नागरीकांच्या चांगल्याच उड्या पडल्या. या प्रकारामुळे रस्त्यावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या. ये-जा करणारे वाहने घटनास्थळी थांबून असून सफरचंदच्या पेट्यादेखील लांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलिसांनी धाव घेतली.