ट्रक चालकाला चौघांनी पिस्तूलाचा धाक दाखवून पाच लाखांचा ऐवज लंपास

0
 एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून चौघांना घेतले ताब्यात
जळगाव । छत्तीसगडहून गुजरातमध्ये एका कंपनीत पोहचविण्यासाठी ट्रकचालक 24 लाखांचे लोखंडी बीम घेवून निघाला होता. खामगावपासून एका चारचाकीने ट्रकचा पाठलाग केला. नांदुराच्या पुढे काही अंतरावर चारचाकीचा अचानक ब्रेक मारून चौघे तात्काळ ट्रकमध्ये बसले. चौघांनी पिस्तुल, खंजरचा धाक दाखवत ड्रायव्हरला बांधून सीटच्या बाजूला टाकले. नांदुरापासून अपहरण केल्यानंतर दरोडेखोरांनी ट्रकचालकाला जळगावातील एमआयडीसी परिसरात ट्रकसह सोडून दिले. दरम्यान, त्यांनी ट्रकचालकाच्या खिशातील 17 हजार रूपये रोख आणि 4 लाख 80 हजार रूपयांचे लोखंडी बीम चोरून नेले. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी तपास करीत 24 तासात चौघांना पाठलाग करून ताब्यात घेतले आहे.
मूळ उत्तरप्रदेशातील सध्या नांदेड येथील रहिवासी असलेले ट्रकचालक जलेदार उर्फ संदीप भजनलाल पाल वय-27 वर्ष हा मनदिपसिंग बलदेवसिंग रा.छत्तीसगढ यांच्या मालकीच्या ट्रक क्रमांक सीजी.04.एलयू.5139 या 22 चाकी वाहनावर गेल्या 8 महिन्यापासून काम करतो. 5 मार्च रोजी जलेदार हा रायगड जिंदल, छत्तीसगढ येथून 24 लाख रूपये किमतीचे 39 नग लोखंडी बीम घेवून जामनगर गुजरात येथील कंपनीत पोहचविण्यासाठी निघाला होता. यावेळी त्याच्याजवळ स्वतःचे 5 हजार रूपये तर मालकाने दिलेले 17 हजार रूपये होते. त्यापैकी जेवण आणि टोल नाक्यावर त्याचे 5 हजार रूपये खर्च झाले होते.
खामगावपासून पाठलाग; पिस्तुल, खंजरचा धाक
दि.6 रोजी सायंकाळी 7.30 वाजता खामगाव ता.बुलढाणामार्गे ट्रक गुजरातकडे रवाना झाला होता. तेव्हा इनोव्हा कार क्रमांक एमएच.22.डी.7000 मध्ये 8 लोकांनी ट्रकचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. खामगावपासून नांदुरापर्यंत कारने ट्रकला 10 ते 12 वेळा ओव्हरटेक केला. नांदुराच्या अलीकडे खराब रस्ता असल्याने कारने अचानक बे्रक दाबला. लागलीच त्यातून 4 व्यक्ती उतरल्या. त्यापैकी 3 इसम ट्रकच्या ट्रॉलामध्ये बसले. त्यांनी फायनान्सवाले असल्याचे सांगून एकाने पिस्तुल दाखविले तर दुसर्याने खंजरचा धाक दाखवित तोंडात कपडा कोंबला. डोळ्यावर कापड बांधून रिव्हॉल्वर डोक्याला लावून स्टेअरींगवरून उचलून कॅबीनमधल्या मोठ्या सीटवर फेकले.
एमआयडीसी परिसरात सोडले
चौघांनी मारहाण करीत जलेदारच्या खिशातील 17 हजार रूपये रोख आणि ट्रकचे आर.सी.बुक बळजबरीने काढून घेतले. त्यानंतर ट्रक जळगावातील एमआयडीसी परिसरात सोडून त्यांनी इनोव्हा घेवून पळ काढला. थोड्यावेळाने कोणीही नसल्याची जाणीव झाल्यावर जलेदारने डोळ्यावरील पट्टी काढून तोंडातील बोळा काढला. ट्रकच्या खाली उतरून पाहिले असता पहाटेचे 4 वाजलेले होते.